HOME   लातूर न्यूज

शेतातील माती आरोग्यदायी बनवा- धीरज देशमुख

मातीतील घटकांवर अन्नधान्यांची पोषकता अवलंबून


शेतातील माती आरोग्यदायी बनवा- धीरज देशमुख

लातूर: आपली धरतीमाता पृथ्वीवर निवास करणा-या लोकांचे अन्न उत्पादन करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत असते. या धरणीमातेची काळजी करण्याची आज गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍नेनी शेतातील मातीला जास्तीत जास्त आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण मातीमध्ये असणार्‍या घटकावर उत्पादीत होणार्‍या अन्नधान्यांची पोषकता अवलंबून असते, असे मत लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. जागतिक मृदादिनानिमित्त मांजरा चॅरीटेबल ट्रस्ट संचलित मांजरा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व आरसीएफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित रबी शेतकरी मेळाव्यात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार त्र्यंबक भिसे उपस्थित होते. तरूण शेतकर्‍यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे असे आवाहन करून धीरज देशमुख म्हणाले की, बाजारपेठेच्या मागणीनुसार शेती पिकवावी, व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन गोष्टींचा अवलंब करावा. मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला उत्पादन गटातील शेतकरी महिलांचे कर्ज उल्लेखनीय असल्याचे नमुद करून गटांच्या माध्यमातून काळानुरूप शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी जागतिक मृदादिन हा केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या वतीने शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यासाठी साजरा केला जातो. शेतकर्‍यांनी मांजरा कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या प्रयोगशाळेच्या वितरीत होणार्‍या जमीन, आरोग्य पत्रिकेनुसार शेती उत्पादन घ्यावे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. एसएस डिग्रसे यांनी केले. त्यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्व विशद करून मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८४४ गावातील एकूण ०२ लाख १३ हजार २८८ माती नमुने तपासणी करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी विजय देशमुख, गोविंद बोराडे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, बादल शेख, डॉ. व्हीपी सुर्यवंशी, रमेश चिल्ले, अभिजित देशमुख, आरसीएफचे विजय कदम, आत्माचे प्रकल्प व्यवस्थापक सीडी पाटील, कृषी विकास अधिकारी बीएस रणदिवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


Comments

Top