HOME   लातूर न्यूज

लग्न समारंभातून 'प्लास्टिकमुक्त भारत' चा संदेश

११११ कापडी पिशव्यांचे वाटप, वसुंधरा प्रतिष्ठानचा उपक्रम


लग्न समारंभातून 'प्लास्टिकमुक्त भारत' चा संदेश

लातूर (आलानेप्र): लातूर येथील युवक श्री. विशाल शिंदे आणि पूजा शिंगटे यांचा विवाह सोहळा नुकताच सोलापूर जिल्ह्यातील वरवडे गावात संपन्न झाला. अवाजवी खर्च टाळून अगदी साधेपणाने पार पडलेल्या या लग्न सोहळ्यातून 'प्लास्टिकमुक्त भारत' चा संदेश देत आलेल्या पाहुणे मंडळीला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सध्या प्लास्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग याचा वापर सर्रास सुरु आहे. याच्या वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा हा संदेश देण्यासाठी या लग्नसोहळ्यात सुमारे ११११ कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना एक कापडी पिशवी भेट देण्यात आली. चला करू 'प्लास्टिकमुक्त भारत'चा निर्धार, हाच नव वधू-वरांना शुभाशिर्वाद असा संदेश या कापडी पिशवीवर देण्यात आला. विशाल शिंदे (विशेष निमंत्रित सदस्य, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर) यांनी आपल्या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण काळाची महत्वाची गरज असल्याचा संदेश दिला आहे. या कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ नव वधू-वरांच्या हस्ते लग्न मंडपात करण्यात आला. यावेळी 'वसुंधरा' प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.


Comments

Top