HOME   लातूर न्यूज

उजनीत बसस्थानक, औशात येणार सगळ्या बसेस

अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्यामुळे तात्काळ आदेश


उजनीत बसस्थानक, औशात येणार सगळ्या बसेस

लातूर: औसा तालुक्यातील तावशी ताड येथील विद्यार्थ्याची होणारी गैरसोय पाहता विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी साध्या व जलद गाड्या आता आशीव व तावशी ताड येथे थांबणार आहेत. उजनी येथील प्रवाशांच्या सोयीसाठी तेथे सुसज्ज बसस्थानकाची उभारणी केली जाणार आहे. औसा मोडवरुन जाणाऱ्या बस स्थानकात येणार आहेत. मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ निर्णय घेत या संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे ०५ जुलै रोजी औसा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी उजनी येथे बचत गटाच्या मेळाव्यानंतर नागरिकांनी त्यांची भेट घेतली. बसस्थानक नसल्याने येथील नागरिकांना लातूर, सोलापूर, औसा, तुळजापूर, उस्मानाबाद येथे येण्याजाण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांना सांगितले. ही गैरसोय दूर करण्यासाठी येथे बसस्थानक बांधावे अशा आशयाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले होते. त्यापूर्वी तावशी ताड येथे ई लर्निंग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यानी तावशी ताड येथे लातूर व उस्मानाबाद जाणारे गाड्या थांबत नसल्याचे सांगितले होते याबाबत गावच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पवार यांच्याकडे निवेदन दिले होते.
मुंबईत गेल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी ही निवेदने मुख्यमंत्र्यांकडे दिली. त्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल यांना पत्र लिहुन आदेशित केले होते. लातूरहुन सोलापूर जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व साध्या व इतर गाड्या सकाळी ८ ते ९.३० व दुपारी २ ते ४ या वेळेत आशिव व तावशी ताड येथे थांबवाव्यात. औसा मोडवरुन जाणाऱ्या सर्व गाड्या औसा बसस्थानकात न्याव्यात असे आदेश दिले आहेत. यावरुन लातूर विभाग नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांना पत्र दिले असुन आशिव व तावशी ताफ येथे सर्व बसेसना थांबा देण्याचे आदेश १० जुलै रोजी दिले. उजनी येथे बसस्थानक बांधण्यासाठी उचित कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेशही मुख्यमंत्री कार्यालयाने दिले असुन यामुळे तेथे लवकरच बसस्थानकाची उभारणी होणार आहे. जनतेच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेवुन बसस्थानक बांधणी व बसेसना थांबा देण्याची कार्यवाही केल्याबद्दल अभिमन्यू पवार यांच्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.


Comments

Top