HOME   लातूर न्यूज

मनपाची दहावी सिटी बस लोकसेवेत रुजू

वाढती गरज लक्षात घेऊन लवकरच आणखी पाच बसेस आणणार


मनपाची दहावी सिटी बस लोकसेवेत रुजू

लातूर: शहर वाहतुकीसाठी मनपाच्या वतीने सिटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी लातूर मधील प्रवाशांच्या सेवेत ०९ सिटी बस धावत होत्या. आज १० व्या सिटी बसचे लोकार्पण महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, परिवहन सभापती मंगेश बिराजदार व स्थायी समिती सभापती ॲङ दिपक मठपती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मराठवाड्यातील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून लातूरची ओळख आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रामुळे लातूरमध्ये वास्तव्यास राहणाऱ्यांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. त्याच बरोबर औद्योगिक विकासामुळेही शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. हा विस्तार लक्षात घेवूनच शहरातील प्रवासासाठी मनपाच्या वतीने सिटी बस सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे शहरातील नागरिकांसह बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनाही माफक दरात प्रवास करता येणे सहज शक्य झाले आहे. यापूर्वी शहरातील प्रवासासाठी मनपाच्या वतीने नऊ सिटी बसेस धावत होत्या. आज दहाव्या सिटी बसचे लोकार्पण करण्यात आले आहे असे यावेळी सांगण्यात आले.
लवकरच आणखी पाच सिटी बस लातूरकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सभापती बिराजदार यांनी दिली. याप्रसंगी सदस्य गुरुनाथ मगे, परिवहन समिती सदस्य हेमंत जाधव, संपत पाटील, धनंजय हाके, शिवदास मिटकरी, मनपाचे उपायुक्त संभाजी वाघमारे, वाहतूक पोलीस निरिक्षक सालार चाऊस, सविता जाधव, नगर अभियंता प्रदीप चिद्रे उपस्थित होते.


Comments

Top