HOME   लातूर न्यूज

नवे वीज मीटर्स: ग्राहकांचे शंका निरसन करा

आमदार अमित देशमुख यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना


नवे वीज मीटर्स: ग्राहकांचे शंका निरसन करा

लातूर: लातूर शहरातील वीज ग्राहकांचे पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटर काढून अत्याधुनिक असे दुसरे वीज मीटर बसविले जात आहे. मात्र या मीटरमुळे वीज ग्राहकांना अधिकचे वीज बिल येत असून यावर लातूर शहरातील वीज ग्राहकातून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी लातूर महावितरण परिमंडळात येणाऱ्या चारही विभागातील अधिकाऱ्याची बैठक घेतली.
लातूर शहरात वीज भारनियमन नाही याचा अर्थ असा की शहरात वीज चोरी नाही असे असताना महावितरणकडून गेल्या काही दिवसापासून वीज गळतीचे कारण समोर करीत पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटर काढून दुसरे वीज मीटर बसविले जात आहेत. मात्र हे मीटर बसविल्यानंतर वीज ग्राहकांना येणाऱ्या वीज बिलात मोठी वाढ होऊन ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. परिणामी वीज ग्राहकाने सध्या बसविण्यात येत असलेल्या वीज मीटरबाबत शंका उपस्थित केल्या असून ग्राहकांच्या शंकांचे निरसन महावितरणने तात्काळ करावे, अशा सूचना संबंधित महावितरण आधिकाऱ्यांना या बैठकीत आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. या बैठकीत शहरातील वीज ग्राहकांना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे उद्भवणाऱ्या समस्यासह वीज ग्राहकांना अचानकपणे सध्या येत असलेले वाढीव वीज बिल, अधिकच्या वीज बिलामुळे वीज ग्राहकांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड, शहरातील बहुतांश प्रभागात विजेचे बंद दिवे, नागरी वस्त्यांमध्ये घरावरून गेलेल्या उच्चदाब विजेच्या तारा, उघड्या डीपी यासह वीज ग्राहकांना महावितरण मुळे होणाऱ्या त्रासाबद्दल उपस्थित मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, व्यंकट बेद्रे, समद पटेल, सपना किसवे, सचिन बंडापल्ले, विक्रांत गोजमगुंडे, रेहाना बासले यांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित केले. उपस्थित प्रश्नावर महावितरणचे कार्यकारी अभियंता एमके सांगळे यांनी उत्तरे देत वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सभापती ललीतभाई शहा, ॲड. विक्रम हिप्परकर, धिरज तीवारी, रईस टाके, दगडू लांडगे, नंदू पोपडे, रामेश्वर पुमपाळे, विजयकुमार साबदे, अहेमद खान पठाण, कैलास कांबळे, फर्जाना बागवान, मोहन सुरवसे, सुपर्ण जगताप, प्रवीण सुर्यवंशी, रघुनाथ बनसोडे, आसिफ बागवान, हकीम शेख, यशपाल कांबळे यांच्यासह व्यापारी, नागरिक उपस्थित होते.


Comments

Top