HOME   लातूर न्यूज

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिला ‘सुपर ३०’ चित्रपट

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या वतीने विशेष शोचे आयोजन


मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिला ‘सुपर ३०’ चित्रपट

लातूर: लातूर शहरात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जाणारे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या माध्यमातून लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९ मधील इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांनी सध्या सर्वत्र गाजत असलेला ‘सुपर ३०’ या चित्रपटाचा आनंद घेतला. शिक्षण क्षेत्रातील वाढते बाजारीकरण, खाजगी शिकवणी चालकांकडून आकारले जाणारे भरमसाठ शुल्क व शिक्षणावर होणारा खर्च पेलू न शकणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. नेमके याच विषयावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजत आहे. बिहार राज्यातील आनंद कुमार यांच्या कार्यावरील चित्रपटाच्या माध्यमातून आनंद कुमार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दरवर्षी ३० मुलांना मोफत शिक्षण देत आयआयटी मध्ये प्रवेश मिळवून देतात. त्यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण या चित्रपटाच्याद्वारे मांडण्यात आलेले आहे. लातूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ०९ मध्येही अशाच प्रकारे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. योगायोगाने या वर्षी इयत्ता दहावी मध्ये ३० विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेण्याबद्दल सकारात्मकता यावी व त्यांच्यामधील शिक्षणाची गोडी वाढून त्यांनीही भविष्यात उच्च शिक्षण प्राप्त करावे या उद्देशाने पीव्हीआर टॉकीज या मल्टिप्लेक्स सिनेमागृहात या विशेष शो चे आयोजन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी स्वखर्चातून केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर आमचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आम्हीही अधिक जिद्दीने अभ्यास करून उच्च शिक्षण प्राप्त करू अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, मुख्याध्यापक धोंडीराम भिंगोले, शिक्षक विलास दिवे, सामाजिक कार्यकर्ते मुस्‍तकीम पटेल उपस्थित होते.


Comments

Top