HOME   लातूर न्यूज

विलासरावांच्या स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे प्रार्थना सभा


विलासरावांच्या स्मृतिदिनानिमीत्त विलासबाग येथे प्रार्थना सभा

लातूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमीत्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार, १४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विलासरावजी देशमुख यांची राजकीय वाटचाल ग्रामीण भागातून झाली. ग्रामीण भागातील समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. कृषीप्रधान व्यवस्थेच्या विकसातूनच राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे याची त्यांना जाणीव होती. यामूळे त्यांचे विकासाचे धोरण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासावर आधारीत होते. सर्वागीण विकास साधायचा असेल, तर आर्थिक क्रांतीची गरज आहे. विकासाचे आर्थिक सुत्र त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषी विकास, सिंचन सुविधा, सहकारी साखर उद्योग, कृषी पथपुरवठा, कृषी प्रक्रीया उद्योग, पायाभूत सोयी-सुविधा उभारणीतून ग्रामीण अर्थव्यवथा मजबूत केली. शहरी भागात गुंतवणूक वाढविली, उद्योगाना पाचारण केले, शहराचा वित्तीय विकास, प्रसार माध्यमाचा विकास, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान आधारीत उद्योग, बांधकाम क्षेत्राचा विकास व मनोरंजन क्षेत्राचा विकास केला. यामुळे ग्रामीण आणि शहरांचा कायापालट करण्यात ते यशस्वी झाले होते. लातूर जिल्हा निर्मीतीनंतर त्यांच्या दुरदृष्टीने आधुनिक लातूरच्या गतीमान विकासाला सुरूवात झाली. १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या सातवा स्मृतिदिन आहे. या निमित्त आदरांजली वाहण्यासाठी बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी विलासबाग, बाभळगाव येथे प्रार्थना सभा आयोजित केली आहे.
या सभेसाठी सकाळी ८.५० वाजता प्रार्थनास्थळी स्थानापन्न होणे अपेक्षित आहे. सकाळी ९.०० वाजता राम बोरगावकर आणि समूह यांचा स्वरांजली कार्यक्रम होईल. यानंतर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी ९.५५ वाजता प्रार्थना सभा संपेल. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर व सचिन सूर्यवंशी करणार आहेत. कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top