HOME   लातूर न्यूज

मुख्य अभियंत्यांचे धाडसत्र, सॉ मीलमध्ये सापडल्या वीज चोऱ्या

कुचराई केल्या प्रकरणी महावितरणच्या कांही अधिकाऱ्यांवरही कारवाई


मुख्य अभियंत्यांचे धाडसत्र, सॉ मीलमध्ये सापडल्या वीज चोऱ्या

लातूर: महावितरण मुख्यालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार संशयास्पद वीज ग्राहकांची लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता आर आर कांबळे यांनी तपासणी केली. तापासणीचा भाग म्हणून मागील दोन दिवसात अहमदपूर तालूक्यात शिरुर ताजबंद आणि किनगाव परिसरात मारलेल्या धाडसत्रात अनेक व्यावसायिक वीज ग्राहकांकडे हजारो रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आल्या. शिवाय, कांही घरगुती आणि औदयोगिक ग्राहकांकडे थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी थेट आकडा टाकून वीज वापर होत असल्याचे उघकीस आल्याने त्यांच्या विरुध्द पोलीसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यानी अहमदपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महावितरण मध्ये सध्या सँपल चेकींग सुरु आहे. अशी तपासणी वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी नियमितपणे करीत आहेत. शिवाय, मुख्यालयास संशयास्पद वाटणाऱ्या ग्राहकांची यादी क्षेत्रिय कार्यालयास पाठविण्यात येते. त्यानुसार तशा संशयास्पद ग्राहकांची तपासणी करण्यात येते. याचाच भाग म्हणून मुख्य अभियंता आर आर कांबळे यांनी १४ आणि १६ ऑगस्ट रोजी अहमदपूर तालूक्यातील शिरुर ताजबंद आणि किनगाव परिसरातील संशयास्पद असणाऱ्या तीस ते चाळीस ग्राहकांची तपासणी केली. त्यात चार सॉ मीलधारकांकडेही तपासणी करण्यात आली. त्यात कांही ग्राहकांकडे मिटरला बायपास करुन वीज वापर होत असल्याचे आढळून आले. कांही वीट भटटयावरही वीज चोरी आढळून आली. इतर कांही व्यावसायिकांकडेही चोऱ्या आढळून आल्या. कांही ग्राहकांनी थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित असतांना महावितरणच्या परस्पर आकडा टाकून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यांच्या विरुध्द गुन्हयाच्या स्वरुपावरुन दंडात्मक तर कांही जनाविरुध्द पोलीसात गुन्हे दाखल करण्याच्या सुचना मुख्य अभियंत्यानी दिल्या आहेत. ज्यांच्याकडे वीज चोऱ्या आणि बेकायदेशीर वीज वापर आडळून आला, त्यांच्यावर असेसमेंट आणि दंडाच्या कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. विजेच्या चोरी प्रकरणाकडे दुर्लक्ष आणि कामात कुचराई केल्या प्रकरणी महावितरणच्या कांही अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे मुख्य अभिंयता आर आर कांबळे यानी सांगितले.


Comments

Top