HOME   लातूर न्यूज

काँग्रेस पक्षाचा झेंडा खांदयावर घेऊन कामाला लागावे

पक्षासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची जबाबदारी आमची- आ. अमित देशमुख


काँग्रेस पक्षाचा झेंडा खांदयावर घेऊन कामाला लागावे

लातूर: लोकसभेच्या निकालाची चिंता न करता नव्या जोमाने काँग्रेस पक्षाचा झेंडा खांदयावर घेऊन कार्यकर्त्यानी कामाला लागावे. आज काँग्रेस पक्षासाठी कार्य करणारा आणि वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याची भविष्यात जबाबदारी आमची असेल, यामुळे आता सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिले. ते लातूर शहर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेस भवन येथे आयोजित महत्वपूर्ण बैठकी प्रसंगी बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस भवन या ठिकाणी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस पक्षाच्या युवक कॉंग्रेस, अल्पसंख्यांक सेल, मागासवर्गीय सेल, कॉंग्रेस सेवादल, यंग ब्रिगेड सेल यासह विविध सेलच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बैठक घेण्यात आली.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, विधानसभा अधिवेशनावेळी लातूरला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था ०१ ऑगस्ट पर्यंत केली जाईल असे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा आढावा नियोजन समिती बैठकीत लातूरला ३१ जुलै पर्यंत कायस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप लातूरकरांचा पाणी प्रश्न निकाली निघाला नाही. उजनीचे पाणी लातूरला अद्याप मिळाले नाही आणि आता पुन्हा एकदा वाटर ट्रेन लातूरला आणण्याचा विचार सत्ताधारी करीत आहेत. या सत्ताधाऱ्यांनी मागील पाच वर्षात लातूरच्या पाणी प्रश्नासह जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नावर काय केले? यावर लातूरच्या मतदारांशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधायला हवा. तसेच लोकसभा निवडणुकीतील अनाकलनीय निकालाचा अधिक विचार न करता पुन्हा एकदा नव्या जोमाने कॉंग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन कामाला लागावे असे आवाहन करीत कॉंग्रेस पक्षासाठी जो कार्यकर्ता कार्य करेल त्या कार्यकर्त्याची सर्व जबाबदारी पालकत्व घेण्याचे संकेत आमदार देशमुख यांनी यावेळी बैठकीत दिले.
दरम्यान महापुरामुळे कुटुंब उध्वस्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील जुनी धामणी गावातील ४०० कुटुंबाना एक महिन्याचे मोफत राशन नेऊन देणाऱ्या लातूरच्या राम गोरड, प्रवीण सूर्यवंशी, अर्जुन माने, गौरव मदने प्रभात पाटील यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्याचा व इस्माईल सय्यद यांच्या नेतृत्वात भाजपातून कॉंग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.


Comments

Top