HOME   लातूर न्यूज

वर्षभर तरी विधानसभा निवडणुका घेऊ नका

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती दलाचे साकडे


वर्षभर तरी विधानसभा निवडणुका घेऊ नका

लातूर: देशाच्या उत्तरेकडील अनेक राज्यात आणि महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर सातारा, रत्नागिरी, पुणे, मुंबई भागात झालेल्या तुफान पावसाने मोठी जिवीत, पशू, शेती आणि वित्तहानी झाल्याने महाराष्ट्रात किमान एक वर्ष तरी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुका घेवून नका, असे भारत निवडणूक आयोगाला बहुजन क्रांती दलाने एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाला पाठविलेल्या या निवेदनात बहुजन क्रांती दलाने म्हटले आहे की, यंदाच्या पावसाळी मोसमात उत्तरेकडील हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड पाऊस, पुरामुळे तिथले सामान्य जनजीवन उध्वस्त झाले आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस होवून पूरामध्ये जीवीत, पशु हानीसोबतच शेती, रस्ते, पूल, घरे, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व सर्वच जनजीवन बरबाद झाले आहे, अब्जावधींचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेवून करोडोंचा खर्च करणे पूर्णतः अमानवी ठरणार आहे. सुसंस्कृत भारताला हे शोभणारे नाही, आणि माणूसकीसाठी निवडणूका घेणे कलंक ठरणार आहे. निवडणुकांवर होणारा करोडोंचा खर्च पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च होणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची किमान एक वर्षभर तरी निवडणूक स्थगित करुन पूरग्रस्तांना न्याय द्यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर बहुजन क्रांती दलाचे महासचिव प्राचार्य डॉ. मधुकर मुंडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. एमबी पठाण तसेच ज्ञानोबा जरीपटके, गौंडराजे आत्राम, साहेबअली सौदागर, सुफी शमशोद्दीन, अनिता वाघमारे, उषा वाघमारे, बाबूराव कोळ्ळे, सोपान कांबळे, सिध्दोधन कांबळे आदिंनी केली आहे.


Comments

Top