HOME   लातूर न्यूज

सामाजिक कार्याची प्रेरणा हा लातूरच्या मातीचाच गुण

आरोग्य शिबीरात सहभागी डॉक्टरांचे आमदार अमित देशमुख यांच्याकडून आभार


सामाजिक कार्याची प्रेरणा हा लातूरच्या मातीचाच गुण

लातूर : समर्पण, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची तयारी हे सर्व गुण लातूरच्या मातीत आहेत. त्यामुळेच येथे अनेक अनुकरणिय पॅटर्न घडताहेत. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी लातूर येथील डॉक्टर मंडळींनी स्वयंस्फुर्तिने आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीरातून आगळावेगळा अनुकरणीय सामाजिक सेवेचा पॅटर्न तयार झाला आहे. या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असे सांगुन उपक्रमात सहभागी डॉक्टरांचे आज माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आभार मानले.
इंडियन मेडिकल असोसिएशन, आयडीए, निमा, होमिओपथी असोसिएशन्स आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनी लातूर शहरासह जिल्हाभरात एकाचवेळी अडीचशेहून अधिक खाजगी रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लातूर शहरासह जिल्हाभरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी निस्वार्थीपणे उत्स्फूर्त सहभाग नोंदवित गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले. या विलासराव देशमुख आरोग्य शिबीरात २१ हजारापेक्षा अधिक रुग्णांची तपासणी झाली. यातील अनेक रुग्णांवर प्राथमिक व तातडीचे उपचार करण्यात आले. या शिबीराबद्दल सर्वत्र कृतज्ञेची भावना निर्माण झालेली असताना माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून २३ ऑगस्ट २०१९ रोजी शिबीरात सहभागी झालेल्या डॉक्टर मंडळींचा कौतुक स्नेह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी देशमुख कुटुंबियांचा सदस्य आणि लातूरचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार देशमुख यांनी सर्व डॉक्टर्स, त्यांचे सहकारी यांचे आभार मानले, त्यांना धन्यवाद दिले. आगामी वर्षातील शिबिराच्या आयोजनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. अजय जाधव, निमा अध्यक्ष डॉ. दयानंद मोटेगावकर, होमियोपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक, दंतवैद्यकीय डॉ. विष्णु भंडारी तसेच डॉ. नम्रता जाजु, डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. दिनेश नवगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, डॉ. ज्योती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती होती. या स्नेह मेळाव्यास शहरातील सर्व नामवंत डॉक्टर्स, आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.


Comments

Top