HOME   लातूर न्यूज

छावा संघटनेने घेतले उपोषण मागे

पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या शब्दावर ठेवला विश्वास


छावा संघटनेने घेतले उपोषण मागे

औसा: जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीत विविध मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीने सुरु असलेले उपोषण पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. या प्रश्नांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकदिनी मुंबईत बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन देणारे पत्र पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांचे पालकत्व स्विकारणाऱ्या संभाजीराव पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवत उपोषण मागे घेत असल्याचे छावा संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी जाहीर केले.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी उपोषण सुरु केले होते. या उपोषणाचा रविवारी दहावा दिवस होता. आंदोलनामागची भूमिका लक्षात घेता पालकमंत्र्यांनी गुरुवारीच उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती पण मुख्य सचिवांचे पत्र मिळावे अशी मागणी त्यांनी केली होती. रविवारी पालकमंत्र्यांनी स्वतः उपोषणकर्त्यांना पत्र दिले. विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत चर्चा केली जाईल. विविध खात्यांचे अधिकारी त्यावेळी उपस्थित असतील असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिले. त्यानुसार संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना उपोषणकर्ते विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले की जिल्ह्यात फिरल्यानंतर शेतकरी व सर्वसामान्यांना काय त्रास होतो याची जाणीव झाली होती. यापुर्वी पालकमंत्र्यानीही अनेक आक्रमक आंदोलने केलेली आहेत. त्यांच्यापासून आणि छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांची प्रेरणा घेवून उपोषण सुरु केले होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली असून त्यांच्या माध्यमातून सरकार आमच्या मागण्या मान्य करेल असा विश्वास असल्यामुळेच सदर उपोषण मागे घेत असल्याची प्रतिक्रिया छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा उपोषणार्थी विजयकुमार घाडगे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, किरण उटगे, सूर्यकांत शिंदे, भगवान माकणे आदींचीही उपस्थिती होती.


Comments

Top