HOME   लातूर न्यूज

लातूरचा बालाजी सुळ बनला महाराष्ट्राचा हास्यकलाकार

स्टार प्रवाहवरील 'एक टप्पा आऊट'मध्ये तृतीय विजेतेपदाचा ठरला मानकरी


लातूरचा बालाजी सुळ बनला महाराष्ट्राचा हास्यकलाकार

लातूर : स्टार प्रवाह वाहीनीवर नुकत्याच झालेल्या स्टँडअप कॉमेडी शो एक टप्पा आऊटमध्ये लातूरचा युवा कलाकार बालाजी सुळ तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला आहे. अस्सल लातूरी भाषेत हास्याचा कल्लोळ करणाऱ्या बालाजीने विनोदाचा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतूक होत असून रविवारी रात्री लातूरात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक गुणी कलावंत म्हणून ओळख असणाऱ्या बालाजी सुळने आंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ आणि राष्ट्रीय पातळीवरील युवक महोत्सवात सहभागी होताना अनेक बक्षिसे मिळवली आहेत. यातून तयार झालेल्या बालाजीची दोन महिन्यापूर्वी स्टार प्रवाह वाहीनीवरील एक टप्पा आऊट या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये ५००० कलाकारांमधून अंतिम १६ कलाकारांमध्ये निवड झाली होती. या अंतिम १६ जणांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत बालाजीने टॉप ३ मध्ये येण्याचा मान मिळवला आहे. जवळपास अडीच महिने चाललेल्या या शोमध्ये बालाजीने लातूर आणि परिसरातील पात्रे उभी करताना अस्सल लातूरी भाषेत विनोद सादर केले. हे करत असतानाच लातूरचा पाणी प्रश्न त्याने प्रकर्षाने मांडला. त्याच्या विनोदातूनही दुष्काळग्रस्तांच्या वेदना जगासमोर आल्या. महाअंतिम सोहळ्यात बालाजीने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील किस्सा सादर करताना परिक्षकांची व पाहुण्यांची दाद मिळवली. बालाजीला ६० हजार रुपये व ट्रॉफी असे पारितोषिक ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव, अक्कासाहेब फेम अभिनेत्री हर्षदा खानवीलकर यांच्या हस्ते देण्यात आले.
या स्पर्धेचे परिक्षक असलेल्या मराठी सिनेसृष्टीतील सुपर स्टार भरत जाधव, प्रसिध्द विनोदवीर जॉनी लिव्हर आणि ज्येष्ठ अभिनेत्री निर्मीती सावंत यांनी बालाजीच्या कलेचे कौतूक करताना त्याच्या रुपाने विश्वविख्यात कलावंत वऱ्हाडकार दिवंगत लक्ष्मण देशपांडे यांचे दर्शन घडल्याचे मत व्यक्त केले. या स्पर्धेत बालाजीला टीम लिडर पोरी जराजपुन दांडाधर फेम अभिनेत्री आरती सोळंकी यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत विजय पटवर्धन, अभिजीत चव्हाण, रेशम टीपणीस आणि पर्ण पेठे, अंकुश चौधरी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सहवास लाभला. या सर्व कलावंतानी बालाजीचे कौतूक केले.
लातूरात जंगी स्वागत
विनोदाच्या मंचावर तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावून शहरात आल्यानंतर बालाजीचे लातुरकरांनी बॅण्ड व फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले. त्याला भेटण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत हा स्वागत व कौतूक सोहळा सुरू होता.


Comments

Top