HOME   लातूर न्यूज

सहा मतदारसंघांसाठी २० निवडणूक कक्ष

विधानसभा निवडणुकीतील जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडावी- जिल्हाधिकारी


सहा मतदारसंघांसाठी २० निवडणूक कक्ष

लातूर: भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि तत्सम अधिकारी-कर्मचारी यांना नियुक्त करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने लातूर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरावर २० निवडणूक कक्षांची स्थापना करण्यात आलेली असून त्याकरिता नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीपेक्षा अधिक तत्परतेने विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम लोकसभा निवडणुकीपेक्षा खूप मोठया प्रमाणात असते. त्यामुळे सर्व संबंधित निवडणूक पथकातील अधिकाऱ्यांनी अधिक गतीने व जबाबदारीने काम करावे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकात आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात. निवडणूक कामांत हलगर्जीपणा करणे अथवा आदेशित केलेल्या कामांवर हजर न होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या सर्व २० कक्षांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोतीयेळे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व २० कक्षांची सविस्तर माहिती दिली. तसेच या प्रत्येक कक्षात नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती देऊन निवडणूकीमध्ये प्रत्येक कक्षाची जबाबदारी सांगितली.


Comments

Top