HOME   लातूर न्यूज

मदत म्हणून दिलेल्या पाण्याचे बील कसे मागता?

पाण्याचे भांडवल केले, रेल्वेचे पैसे शासनाने द्यावेत- आ. अमित देशमुख


मदत म्हणून दिलेल्या पाण्याचे बील कसे मागता?

लातूर: रेल्वेने लातूरला केलेल्या पाणी पुरवठयाचे जवळपास १० कोटी रूपयाचे बील रेल्वे विभागाने लातूर महानगरपालीकेला पाठवले आहे. हे बील म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे. सत्ताधारी या पाणी पुरवठ्याचे सोयीने भांडवलही करतात मग बील मनपाने का भरायचे? मदत म्हणून दिलेल्या पाण्याचे बील कसे देता? हे बील शासनाने भरावे अशी प्रतिक्रिया आ. अमित देशमुख यांनी दिली आहे. सन २०१६ मधील भीषण दुष्काळात लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावेळी शासनाने मोठा गाजावाजा करून लातूरला रेल्वेने पाणी आणले, भाजपाकडून आजही त्या गोष्टीचे भांडवल केले जाते. वास्तविक पहाता अनेक सामाजिक संघटना, शिक्षण संस्था यांनी स्वंयस्फुर्तीने लातूरात पाणीपुरवठा केला, रेल्वेचेही पाणी मिळाले त्याबददल लातूरकरांनी सर्वाचे आभार मानले होते. संकटकाळी केलेल्या या पाणी पुरवठयांच्या मदती बददल आता रेल्वे विभागाने लातूर महानगरपालिकेला जवळपास ९ कोटी ९० लाख रुपयाचे बील पाठवले आहे. यावर्षी अर्धा पावसाळा संपत आलेला असतांना पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पुन्हा पाणी संकट उभे राहीले आहे. या परिस्थितीत रेल्वे विभागाने १० कोटीचे बील पाठविणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच प्रकार आहे. वास्तविक त्यावेळी रेल्वेचा पाणीपुरवठा हा मदतीचा भाग होता. या मदतीचे बील कसे असू शकते? असा प्रश्न उपस्थित करून कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका हे बील भरणार नाही, रेल्वेला पैसे हवे असतील तर ते शासनाने दयावेत असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top