HOME   लातूर न्यूज

लातूर शहरातील पाच विहिरींचे अधिग्रहण

विसर्जनास मनाई, टंचाईवर मात करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रयत्न


लातूर शहरातील पाच विहिरींचे अधिग्रहण

लातूर: लातूर जिल्हयातील पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता गत वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. लातूर शहरास पिण्याचे पाणी पुरवठा होत असलेल्या मांजरा प्रकल्प धनेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाटबंधारे प्रकल्पाच्या अहवालानुसार ५.३२१ दलघमी आहे. प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे लातूर शहरास पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होवू शकते. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कलम 57 व 65 अन्वये आपत्कालीन परिस्थितीत लातूर महानगर पालिका हद्दीतील गोरक्षण संस्था मेन रोड लातूर येथील विहिर, सिंचन भवन, औसा रोड, लातूर येथील विहिर, सिध्देश्वर मंदिर, लातूर येथील विहिर, शासकीय कॉलनी बार्शी रोड, लातूर येथील विहिर, आर्वी येथील तिवारी यांची विहिर कायमस्वरुपी अधिग्रहीत करण्यात येत आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. त्याअनुषंगाने महानगर पालिका लातूर यांनी पिण्याच्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने या विहिरी आपल्या स्तरावर अधिग्रहीत करुन उपलब्ध पाणीसाठा स्वच्छ व सुरक्षित राहील या दृष्टीने कार्यवाही अनुसरण्यात यावी. या विहिरीत विसर्जन करु नये आणि निर्माल्य किंवा घाण होवू नये म्हणून दुरुस्ती करुन जाळी बसविण्यात यावी. त्याचा खर्च टंचाई मधून करण्यात यावा. तसेच या विहिरीतील पाणी पिण्या योग्य आहे का याची तपासणी प्रयोगशाळेत करुन घ्यावी. या विहीरीचे पाणी शुध्द राहील याची खात्री करावी, त्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करावी. या आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश जिल्‍हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत.


Comments

Top