HOME   लातूर न्यूज

मूल गमावलेल्या मातेला जिल्हाधिकाऱ्यांची मदत

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ मिळवून द्या प्रशासनाला आदेश


मूल गमावलेल्या मातेला जिल्हाधिकाऱ्यांची मदत

लातूर: एसओएस समोरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केलेल्या वसाहतीत पाच दिवसांपूर्वी एका हौदात पडून नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकामार्फत त्या मृत मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आदेशित केले आहे.
लातूर शहरातील अनधिकृत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांसाठी पूर्व भागात गरूड चौकानजीक पूर्वीच्या नगर पालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे बांधलेल्या वसाहतीजवळ एक मोठा हौदही बांधण्यात आला होता. त्यात नेहमी पाणी साचलेले असायचे. त्यामध्ये बुडून मंगळवारी त्याच वसाहतीत राहणाऱ्या रितेश संमुखराव या आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना माध्यमातून समजल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यातल्या संवेदनशील माणूस जागा झाला. तीन दिवस झाल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रभागाचे नगरसेवक सचिन बंडापल्ले यांच्यामार्फत मृत मुलाची आई राधा संमुखराव व इतर कुटुंबियांना थेट आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. नऊ वर्षाच्या हसत्या-खेळत्या मुलाला गमावलेल्या त्या मातेचं दु:ख त्यांनी समजून घेतले. त्यांचे सांत्वन केले. प्रशासनाच्या चुकीमुळे उघड्या राहिलेल्या हौदात पडून मुलाचा जीव गेल्यामुळे त्यांनी कुटुंबियांची वैयक्तिक माफीही मागितली. यावेळी अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. मृत झालेल्या शाळकरी मुलाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आपल्या विभागाशी थेट संबंध नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता ह्रदयस्पर्शी ठरली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दु:ख समजून घेतले
आपला जन्म झोपडपट्टीत झाला. नगरपालिकेने बांधलेल्या वसाहतीमुळे हक्काचा निवारा मिळाला होता. मात्र त्यात राहण्यासाठी पोटचा गोळाच सोबतीला नाही याचे मोठे दु:ख आहे. कलेक्टरांसारख्या मोठ्या अधिकाऱ्याने घरी बोलावले याचे अगोदर आश्चर्य वाटले. त्यांनी माझ्याशी संवाद साधत माझे दु:ख समजून घेतले. त्यामुळे मन हलके झाले, अशी प्रतिक्रिया मृत मुलाची आई राधा संमुखराव यांनी व्यक्त केले.


Comments

Top