HOME   लातूर न्यूज

डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आणि १०५ फुटी ध्वजाचे लोकार्पण

निलंग्यात अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा उभारणार- पालकमंत्री निलंगेकर


डॉ. बाबासाहेबांचा पुतळा आणि १०५ फुटी ध्वजाचे लोकार्पण

लातूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो. तर राष्ट्रध्वजामुळे राष्ट्रभक्ती निर्माण होते. त्यामुळे युवकांनी मनामध्ये राष्ट्रवादहित निष्ठा जोपासून तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कुशलतेने करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, माजी सैनिक कल्याण व कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा नगर परिषदेच्या वतीने निलंगा येथे आयोजित १०५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत अरविंद पाटील निलंगेकर, निलंगा पंचायत समिती सभापती अजित माने, मोहन माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, मोहन माने, भन्ते व इतर अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व एकशे पाच फूट उंचीचा राष्ट्रध्वज लोकार्पण सन्मान आपल्याला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून हा क्षण संपूर्ण निलंगावासियांसाठी ऐतिहासिक आहे. निलंगा शहरासह जिल्ह्यात इतर तीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी होत आहे. निलंगा शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा पंचायत समितीच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या १०५ फूट उंचीच्या राष्ट्रध्वज व टाऊन हॉल येथे उभारण्यात आलेल्या १२ फूट उंचीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी निलंगा शहर व तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले. तसेच यावेळी विद्यार्थ्याकडून राष्ट्रध्वजाची लहर निर्माण करण्यात आली. या लोकार्पण कार्यक्रमास निलंगा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रगीताने झाला.


Comments

Top