HOME   लातूर न्यूज

चाकूरकरांना आमदारकी कधी मिळणार?

सांगवीकरांनंतर परंपरा खंडीत, आ. पाटीलही भाजपात हाकेंचं काय?


चाकूरकरांना आमदारकी कधी मिळणार?

चाकूर: अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढविण्यासाठी चाकूरच्या भुमीपुत्रांनी मागणी केली असल्याने पुन्हा भुमीपुत्रांचा विषय चर्चिला जात असुन चाकूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच वेळी चाकूर तालुक्यातील बनसांगवीचे सुपुत्र कै. अॅड. महालिंगप्पा सांगवीकर यांना आमदार होण्याचा मान मिळाला होता. त्यांच्या नंतर चाकूरकर नेते मंडळींना या मतदार संघात पुन्हा संधी मिळाली नाही. गतवेळी भाजपाकडून गणेश हाके यांना उमेदवारी मिळाली होती. अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील विजयी झाले होते. आमदार विनायकराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी चाकूर तालुक्यातील भुमीपुत्र प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. गणेश हाके प्रदेश प्रवक्ते म्हणून पक्षाची व सरकारची भूमिका कायम मांडत आहेत. उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी यांनी लहानपणापासूनच संघाच्या माध्यमातून विविध स्तरावर कार्य केले आहे. व्यापारी असोशिएशनच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी केली. चाकूर नगरपंचायतीत पहील्यांदा नगरसेवक म्हणून काम करीत असताना विविध विकासकामाचा धडाका लावला. चाकूर नगरपंचायतीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता पालटून नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता आणण्यात मोठी भूमिका निभावली होती. बालाजी पाटील चाकूरकर यांनी सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे करण्याचे मोठे सामाजिक कार्य केले आहे. जनतेच्या विविध समस्यासाठी आंदोलने करून मार्गी लावण्याचे काम केले आहे. अहमदपूरकर आमदार असल्याने चाकूर तालुक्यातील विकासाचे प्रश्न हा विषय कायम आहेत. त्यामुळे चाकूरच्या भुमीपुत्रांचा मुद्दा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा चर्चिला जात आहे. पहिले आमदार कै. अॅड. महालिंगप्पा सांगवीकर यांच्यानंतर अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याची संधी कोणाला मिळणार याकडे चाकूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


Comments

Top