HOME   लातूर न्यूज

शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोचवल्या

पालकमंत्री निलंगेकर यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा उत्साहात शुभारंभ


शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोचवल्या

देवणीः काँग्रेस आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात जी कामे झाली नाहीत ती कामे भाजपा महायुतीच्या पाच वर्षाच्या काळात झालेली आहेत. सरकार व जनतेतील अंतर कमी करून लोकहिताच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत पारदर्शक कारभारामुळे दलालांचे राज्य संपविण्यात सरकारला यश आलेले आहे. आगामी काळातही जनतेचा विकास अधिक गतीने व्हावा याकरिता तुमच्या आशिर्वादाची गरज असून आपला आशिर्वाद आमच्यासोबत असावा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री निलंगेकरांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. या यात्रेदरम्यान जनतेशी संवाद साधत असतांना पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. देवणी तालुक्यातील दरेवाडी (बालाजीवाडी) येथील बालाजीचे दर्शन घेवून मंदिराचे महंत मौनी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. आघाडी सरकारच्या काळात सरकार व जनता यामध्ये फार मोठी दरी तयार झाली होती म्हणुनच विकासाची गंगा खुंटली होती.पण मागील पाच वर्षात ही दरी दुर केल्यानेच झालेल्या नानाविध कामाच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट मतदार संघात दिसतेय असे सांगत पालकमंत्री निलंगेकर यांनी, शासनाच्या अनेक योजना मतदारांच्या दारात पोहचविल्या असल्याचे स्पष्ट केले. हा विकासाचा लेखाजोखा घेवुनच पुढील विकासाच्या वाटचालीसाठी जनआशिर्वादाची गरज आहे. सामान्य कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग व व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला असून या माध्यमातून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य उदयास येत आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळातील कामामुळे अनेक फरक दिसून येवू लागले असून आता आगामी काळात विकासाची गंगा कायमस्वरूपी वाहती राहावी याकरिता भाजपा महायुतीचा बहुमताने विजय होणे ही काळाची गरज आहे. यासाठी जनतेचा आशिर्वाद आम्हाला मिळावा असे आवाहन यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी केले.
या यात्रेत ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, देवणीचे नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, सभापती सत्यवान कांबळे, उपसभापती शंकरराव पाटील, जि.प.सदस्य पृथ्वीराज शिवशिवे, सभापती अजित माने, माजी उपसभापती तुकाराम पाटील, बस्वराज पाटील, काशिनाथ गरीबे, भाजयुमोचे प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, सुधीर भोसले, सभापती बालाजी बिरादार, चंद्रशेखर महाजन, महेश सज्जनशेट्टे, सुशांत पाटील, विठ्ठल देबडे, ह. भ. प. सुभाष मोरे आदींसह पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवणी तालुक्यातील गावागावात ही जनआशिर्वाद यात्रा पोहचताच या यात्रेचे गावकर्‍यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत होते.


Comments

Top