HOME   लातूर न्यूज

विधानसभा निवडणुकीची पूर्वपिठीका प्रकाशित

कैलाशचंद मीना लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघाचे निरीक्षक


विधानसभा निवडणुकीची पूर्वपिठीका प्रकाशित

लातूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका पुस्तिका तयार करण्यात आली. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, नायब तहसिलदार हरीष काळे, बीएसएनएल चे जनसंपर्क अधिकारी एसआर कुलकर्णी, रामेश्वर गिल्डा, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, प्रदीप नणंदकर, अरुण समुद्रे, अशोक चिंचोले, विकास गाढवे, इतर वृत्तपत्रांचे तसेच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या पूर्वपीठिकेमध्ये विधानसभा निवडणूक कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटची ओळख, निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, अंतिम मतदार संख्या, मतदान केंद्राची माहिती व सखी व सक्ष्म मतदान केंद्र, मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न, सायबर सुरक्षा, मतदारांच्या सुविधांसाठी निवडणूक आयोगाकडून सुरु केलेले विविध प्रकारचे ॲप्स, महत्वाची संकेतस्थळे, विधानसभा मतदारसंघनिहाय सन 1990, 1995,1999, 2004,2009, व 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारसंघनिहाय माहितीचा समावेश आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी ही पुस्तिका संदर्भ पुस्तिका म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल.
निवडणूक निरीक्षक कैलाश चंद मीना यांची नियुक्ती
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हयातील 234-लातूर (ग्रामीण) व 235-लातूर (शहर) या विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) म्हणून कैलाशचंद मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कैलाशचंद मीना हे लातूर (ग्रामीण) व लातूर (शहर) विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजावर देखरेख करणार आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील कामाविषयी काही तक्रार असल्यास मीना यांना शासकीय विश्रामगृह, औसा रोड, लातूर येथे सकाळी दहा ते अकरा या वेळेत भेटता येवू शकेल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मीना यांनी रेणापूर पोलीस चौकीला भेट दिली आणि तेथील अधिकाऱ्यांशी मतदान प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था, मतदार जागृती आदी विषयांवर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी श्रीराम विद्यालय येथे भेट देऊन बीएलओ आणि गटविकास अधिकारी यांना सूचना मतदान अधिकाधिक होणेबाबत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आणि इतर ठिकाणी मतदार जनजागृतीबाबत अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Comments

Top