HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री सहाय्यता निधी सांभाळणारे शेटे औशात!

अभिमन्यू पवार यांच्या मैत्रीखातर, हजारोंच्या आरोग्यासाठी केले प्रयत्न


मुख्यमंत्री सहाय्यता निधी सांभाळणारे शेटे औशात!

औसा: मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे औसा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीतील घटक पक्षांसह इतरही अनेक घटक सक्रिय आहेत. पवार यांचे विविध क्षेत्रात असणारे मित्र औशात दाखल झाले आहेत. या मित्रांमध्ये एक नाव आहे ओमप्रकाश शेटे. मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी सांभाळणारे शेटे हे पवार यांचे खास मित्र आहेत. पवार यांच्या विजयासाठी ते औसा येथे तळ ठोकून आहेत. अभिमन्यू पवार आणि ओमप्रकाश शेटे हे दोघे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जणू हातच. या दोघांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनहिताची अनेक कामे केली. शेटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता विभाग सोपवला. हा विभाग चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे मुख्यमंत्र्यांनी शेटे यांच्या माध्यमातून दाखवून दिले. शेटे यांच्यासारखा कार्यक्षम व्यक्ती या विभागाला प्रमुख म्हणून लाभल्यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांची उपचाराची सोय झाली. कित्येक रुग्णांचे प्राण वाचले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा प्रकारच जनतेला या सरकारच्या काळात कळला. विशेषतः शेटे यांची कार्यपध्दती पाहता ते लोकप्रिय झाले. कोणताही गरजू रुग्ण अथवा त्याचे नातेवाईक आले असता त्याला योग्य मदत ते करतात. यामुळे महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मंत्रालयात काम करताना अभिमन्यू पवार आणि शेटे यांची मैत्री झाली. जनहिताला प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली. आता अभिमन्यू पवार यांनी राजकीय वाटचाल सुरु केली. महायुतीने त्यांना औसा विधानसभा मतदारसंघात तिकीट दिले. अशावेळी मदतीला न येईल तो मित्र कसला? ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या मित्राच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते औशात दाखल झाले. औसा येथे थांबून त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. पवार यांच्यासमवेत तसेच स्वतंत्रपणे त्यांनी काम सुरु केले आहे. कठीण प्रसंगात हजारो रुग्णांना मदत करणारे शेटे आहेत तरी कोण? अशी उत्सुकता अनेकांना आहे. आता ते स्वतः औसा मतदारसंघात फिरत असल्याने साहजिकच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अनेकजण आपली कामे करून घेण्यासाठी, रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना विनंती करत आहेत. अशा मंडळींना योग्य मार्ग दाखवतानाच अभिमन्यू पवार यांना विजयी करा, असे आवाहन करण्यास मात्र ते विसरत नाहीत. मित्राला गरज असताना स्वतःहुन येत केली जाणारी ही मदत पवार यांच्यासाठी निश्चितच मोलाची ठरणार आहे.


Comments

Top