HOME   लातूर न्यूज

लातूरकरांचे पाणी पळविणार्‍यांना धडा शिकवा

महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचे कॉर्नर बैठकांमध्ये आवाहन


लातूरकरांचे पाणी पळविणार्‍यांना धडा शिकवा

लातूर: लातूरला निर्माण झालेली पाणीटंचाई नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. लातूरकरांच्या तोंडचे पाणी आपल्या साखर कारखान्यांसाठी पळविणार्‍यांना धडा शिकवा, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी शहरातील ठिकठिकाणच्या कॉर्नर सभांमध्ये बोलताना केले. लातूरचे आमदार लातूरकर नसून मुंबईकर आहेत. त्यांना मुंबईलाच राहू द्या, असे नमूद करून शैलेश लाहोटी यांनी लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळविणार्‍या धनदांडग्या कारखानदारांना मांजराच्या कोरड्या पात्रात फेकून द्या, असेही ते म्हणाले. लातूरकरांना मागील काळात रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. त्यानंतर स्थानिक आमदारांनी लोकप्रतिनिधी या नात्याने लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची वेगळ्या पद्धतीने नियोजन करून ते अंमलात आणायला हवे होते. उजनीचे पाणी आपल्या शेजारच्या उस्मानाबादला आले; परंतु लातूरला आले नाही. ही स्थानिक आमदाराची निष्क्रियता आहे. उजनी धरणात पिण्याच्या पाण्यासाठी साधे आरक्षणही त्यांनी टाकले नाही, अशा या निष्क्रिय उमेदवाराला पराभूत करण्याची ही मोठी संधी असल्याचे शैलेश लाहोटी यांनी सांगितले. लातूरच्या अवतीभवती अपेक्षेपेक्षा जास्त कारखाने उभारण्यात आले. या कारखान्यांसाठी मांजराच्या धरणातून नियमित पाणी घेण्यात आले. त्याचा फटका लातूरकरांना बसला आहे. पाणी प्रथम पिण्यासाठी, शेतीसाठी व त्यानंतर कारखानदारांसाठी असा क्रम असावा लागतो. मात्र, लातुरात याउलट क्रम
असल्यामुळे लातूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यास जबाबदार असलेल्या साखर कारखानदारांना पराभूत करून धडा शिकवा, असे आवाहन लाहोटी
यांनी केले. या प्रसंगी गौरव मदने, विक्रम कांबळे, सुनील मलवाड, पप्पू धोत्रे, रईस टाके, रियाज शेख, संजय गिरी, चंद्रकांत वाघमारे, बालाजी डावरे, राहूल
कांबळे, दुर्गेश चव्हाण आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.


Comments

Top