HOME   लातूर न्यूज

लातुरात नळांना मीटर्स बसवा!

नियमितपणे योग्य दरात पाणी पुरवठा करा, जलयुक्त लातुरची मागणी


लातुरात नळांना मीटर्स बसवा!

लातूर: लातूर शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसवून मीटर प्रमाणे योग्य दरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जलयुक्त लातूरच्या वतीने एका निवेदनाद्वारे लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात जलयुक्त लातूर सर्वांसाठी पाणी या सामाजिक चळवळीच्या वतीने पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, लातूर शहराला शाश्वत पाणी पुरवठा व्हावा यासाठी सन २०१६ साली जलयुक्त लातूरच्या माध्यमातून मांजरा नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. लातूर मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनाही दि. १६ जून २०१८ रोजी एक निवेदन देऊन लातूर शहरातील नळांना मीटर बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर हा विषय आहे तसा राहिला. त्यामुळे आता या बाबतीत फारसा वेळ न दवडता नळांना मीटर बसवून योग्य दरात नियमित पाणी पुरवठा केला जावा. प्रायोगिक पातळीवर जुना औसा रोड वरील पाण्याच्या टाकीवरून आदर्श कॉलनी परिसरात मीटर यंत्रणा कार्यान्वित करून या भागात नित्य पाणी पुरवठा सुरु करावा. जेणेकरून शहराच्या इतर भागातील नागरिकांना हे एक आदर्श मॉडेल दिसेल. या योजनेसाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते या भागात जनजागृतीच्या मीटर यंत्रणा महत्व व अन्य सर्व जल विषयांवर सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर जलयुक्त लातूरचे डॉ. अशोकराव कुकडे, ज्येष्ठ सामाजिक नेते मनोहरराव गोमारे, मकरंद जाधव, बी.बी. ठोंबरे, शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे, अरुण डंके, योगेश कर्वा, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मनपा आयुक्त सिंह यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले आहे.


Comments

Top