HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यातील बॅंकांची एकच वेळ

एक नोव्हेंबरपासून अकरा ते पाच दरम्यान व्यवहार; बॅंकर्स कमिटीचा निर्णय


लातूर जिल्ह्यातील बॅंकांची एकच वेळ

लातूर: जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लीक सेक्टर) १७ बॅंकांचे व्यवहार आता सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. या बॅंकांच्या कामकाजात एकवाक्यता आणण्यासाठी जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीने हा निर्णय घेतला असून सर्व बॅंकांच्या व्यवहाराची एकच वेळ असणार आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांसह नागरिकांची सोय होणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील १७ बॅंकांचे व्यवहार व कामकाज त्या त्या भागातील गरज व मागणी लक्षात घेऊन सुरू होते. यातूनच बॅंकांच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. सर्व बॅंकांची वेळ असल्याचे समजून ग्राहकांची फसगत व्हायची. यात बॅंकांकडूनही वेळेबाबत मनमानी सुरू होती. देशभरात हा प्रकार सुरू होता. यातूनच इंडियन बॅंक असोसिएशनच्या उपसमितीने ग्राहकांच्या सोयीनुसार बॅंकांच्या तीन वेळा निश्चित केल्या व प्रत्येक जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीने यापैकी एक वेळ निश्चित करावी, असे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला हे अधिकार देण्यात आले होते. यात सकाळी नऊ ते दुपारी तीन, सकाळी दहा ते दुपारी चार व सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशा वेळा देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली. या बैठकीस स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक अभिजीत पांगरेकर व बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सहायक महाप्रबंधक गिरीष भगुरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. समितीच्या निर्णयानुसार येत्या एक नोव्हेंबरपासून या बॅंकांचे व्यवहार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार असून या वेळेत ग्राहकांना पैसे काढणे तसेच पैसे भरण्यासह अन्य व्यवहार करता येणार आहेत. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत बॅंकांना त्यांचे अंतर्गत कामकाज करता येणार आहे, असे समितीचे सचिव तथा जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्रीनिवासलु पुजारी यांनी सांगितले.
या बॅंकांसाठी एकच वेळ
सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ही एकच वेळ लागू केलेल्या बॅंकांत अलाहाबाद बॅंक, आंध्रा बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, देना बॅंक, इंडियन बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिंडीकेट बॅंक, युको बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया व विजया बॅंकेचा समावेश आहे.


Comments

Top