HOME   लातूर न्यूज

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या

आ. धीरज देशमुख यांनी तहसीलदारांना दिली सूचना, शेतकऱ्यांना धीर


शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या

लातूर: लातूर तालुक्यात मागच्या १५ दिवस सलग झालेल्या परतीच्या पावसाने हाती आलेले सोयाबीन, ज्वारीच्या पिकांचे आतोनात नुकसान केले आहे़. अतिवृष्टी झालेल्या गावांतील पिके जमीनदोस्त झाली़. शेतकरी अडचणीत सापडलेला असताना भाजपा-शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा खेळ सुरु आहे़. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार, धीर आणि त्यांच्या व्यथा, वेदना ऐकून घेण्यासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार धीरज देशमुख यांनी थेट शेतात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला़. नुकसानीची पाहणी केली आणि नुकसान झालेल्या पिकांची ड्रोनच्या साह्याने तातडीने पाहणी करावी, अशी सूचना तहसीलदार स्वप्नील पवार यांना करुन पीकपेरानुसार शेतकऱ्यांना सरसकट नुकसानीची भरपाई द्यावी, असेही आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले़.
धीरज देशमुख यांनी शनिवारी सकाळी औसा तालुक्यातील वरवडा येथील प्रशांत कुलकर्णी यांच्या शेतातील नासलेल्या कांदा पिकाची, बाबूराव डुमणे यांच्या शेतातील मोड आलेल्या पिवळ्या ज्वारी पिकाची, बालाजी लुंगसे यांच्या सोयाबीन तर उमाकांत करंडे यांच्या उडीद पिकांच्या नुकसानीची पाहणी केली़. यावेळी औसा तालुक्याचे तहसीलदार, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांच्यासह श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, विजय देशमुख, सदाशिव कदम, सचिन दाताळ, कैलास पाटील, नारायण लोखंडे, सदाशिव कदम, गोविंद बोराडे, मनोज पाटील, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी वरवडा गावचे सरपंच हरिदास विष्णू साखरे, अशोक करंडे, गुणवंत करंडे, उमाकांत करंडे, अर्जुन मुरूमकर, हरेश्वर करंडे, सोमनाथ पाटील, संतोष मडजे, उपसरपंच हणमंत मडजे आदीसह औसा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Comments

Top