HOME   लातूर न्यूज

लिंगायत समाज हा माझा समाज- आ. अभिमन्यू पवार

मोफत वधू-वर परिचय मेळावा हा गरिबांसाठी खूप चांगला उपक्रम


लिंगायत समाज हा माझा समाज- आ. अभिमन्यू पवार

लातूर: वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने घेण्यात येत असलेला मोफत वधू-वर परिचय मेळावा हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. अशा प्रकारचे मेळावे हे गरिबांसाठी अत्यंत उपयुक्त व मदतगार ठरतात लिंगायत समाज माझा समाज आहे असे प्रतिपादन औशाचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
लातूर येथील वीरशैव-लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मोफत वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर देविदास काळे, प्रेरणा होनराव, जयश्रीताई पाटील, बाबासाहेब कोरे, मेळाव्याचे संयोजक नागेश कानडे, स्वागताध्यक्ष दयानंद पेदे, उमाकांत कोरे, लक्ष्मीकांत मंठाळे, विश्वनाथ निगुडगे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले की, समाजात आज आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यामागचं मुख्य कारण विवाहाची चिंता हे एक आहे. आपल्या मुलीचा विवाह जमत नाही. जमला तर त्याच्या खर्चाची चिंता यातून अनेक पालक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. यावर विरशैव लिंगायत समाजाने सुरु केलेला हे मोफत वधू-वर परिचय मेळावा हा अशा गरिब लोकांची चिंता मिटविणारा असून समाजाच्या वतीने लावण्यात येणारे निशुल्क विवाह, पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळावा हे उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे आ. पवार म्हणाले. फेसबूक, व्हॉट्स ॲपवर विवाह जुळत असल्याचे आपण आज पाहतो. मात्र ही आपली संस्कृती नाही. वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विवाह जुळवून एक प्रकारे विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने संस्कृतीचे जतन करण्यात येत असल्याचे उद्गारही आ. अभिमन्यू पवार यांनी काढले. यावेळी उपमहापौर देविदास काळे यांनी वधू -वर परिचय मेळावे हे यज्ञकर्म असून, या गोष्टी करणे अवघड आहे मात्र तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. चांगल्या कामात अडथळे येतात. मात्र त्यातून मार्ग काढत ते सुरु ठेवायला हवे असेही ते म्हणाले. यावेळी प्रेरणा होनराव, बाबासाहेब कोरे, संयोजक नागेश कानडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात उमाकांत कोरे यांनी मेळावा आयोजनामागची भूमिका विशद करताना विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपोयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच जवळपास दीड हजार वधू-वरांची नोंदणी आतापर्यंत झाल्याचे सांगितले. औपचारिक उद्घाटनानंतर वधू-वर परिचय पार पडले. यात जवळपास ३०० जणांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष मनोज मिटकरी, विवेक जानते,शिवगंगा कानडे, सिद्राम पोपडे, पंकज कोरे, आशिष स्वामी, महेश काळे, अविनाश जावळे, प्रशांत बोळेगावे, संगमेश्वर झुंजे, कैलास इंडे, गणेश इंडे, गणेश कोरे यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
लिंगायत समाज माझा समाज : आ. पवार
यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी मी ज्या मतदार संघातून निवडून आलो आहे तिथे लिंगायत समाजाचे योगदान मोठे आहे. तसेच लहानपणापासून माझा मित्रपरिवार लिंगायत समाजात मोठा आहे. अनेक वर्षे मी यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे माझ्या जडण -घडणीत लिंगायत समाजाचा मोठा वाटा आहे. लिंगायत समाज हा माझा समाज असून मी तन, मन, धनाने समाजासोबत उभा असल्याचे भावोद्गार पवार यांनी काढले.


Comments

Top