HOME   लातूर न्यूज

आता लातूरला दहा दिवसांआड पाणी

एमआयडीसीच्या पाणी पुरवठयात वाढ, प्रतिदिन ०६ एमएलडी पाणी मिळणार


आता लातूरला दहा दिवसांआड पाणी

लातूर: लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात परतीच्या पावसामुळे ४१.७४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण झाल्याने लातूर शहराचा पाणीपुरवठा १५ दिवसांऐवजी दहा दिवसाला एक वेळ याप्रमाणे करण्यास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मान्यता दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त एमडी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश शिवणे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे विविध पाणी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ही ४१.७४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे लातूर शहराची पाणीकपात अंशत: मागे घेऊन यापुढील काळात दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. पुढील काळात नागरिकांनी मिळणारे पाणी अत्यंत काटकसरीने वापरून पाण्याची बचत करावी. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी दक्षता घ्यावी व पाणी बचतीच्या विविध उपाय योजना राबवाव्यात. याकरिता लातूर महानगर पालिका प्रशासन हे आपल्याला सहकार्य करेल असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून पाणी बचतीस लातूरकर नागरिकांनी अधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.
एमआयडीसीला प्रतिदिन सहा एमएलडी पाणी
लातूर एमआयडीसीला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु मांजरा धरणातील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने एमआयडीसीला प्रतिदिन ०२ एमएलडी इतकाच पाणीपुरवठा सध्या केला जात होता. परतीच्या पावसामुळे मांजरा धरणातील पाणीसाठा वाढ झालेली असून एमआयडीसीने प्रतिदिन १० एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाला केली होती, त्या मागणीवर टंचाई आढावा बैठकीत चर्चा होऊन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर एमआयडीसीला प्रतिदिन सहा एमएलडी पाणीपुरवठा करावा अशा सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. लातूर एमायडीसीचे मांजरा धरणातील पाणी आरक्षण हे प्रतिदिन बारा एमएलडी इतके आहे.


Comments

Top