HOME   लातूर न्यूज

वीज चोरी कळवा, रोख बक्षीस मिळवा

महावितरणचे खबर्‍यांना आवाहन, किमान दहा टक्के बक्षीसाची हमी


वीज चोरी कळवा, रोख बक्षीस मिळवा

लातूर: वीज चोरीच्या प्रकारामुळे वीज हानी बरोबरच आर्थिक नुकसानही महाविरतणला सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने वीज चोरी कळवा आणि १० टक्के रक्कम मिळवा असा उपक्रम हाती घेतलेला आहे. पूर्वी वीज चोरीची माहिती कळविल्यानंतर केवळ एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीज चोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिक हवा तितका प्रतिसाद नव्हता. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये व्यावसायिक आणि औद्योगिक ठिकाणी वीज मीटरमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करुन किंवा कोणत्याही प्रकारे होणाऱ्या विज चोऱ्यांची माहिती असणाऱ्यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी. माहिती कळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीज चोरी कळविणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल. वीज चोरीची माहिती कळविणाऱ्या खबऱ्यास वीज चोरीची संपूर्ण प्रक्रिया आणि तपासणीअंती अंतिम केलेली रक्कम व दंड यांचा भरणा केल्यास १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देण्यात येईल. तर त्यावरील पैसे आरटीजीस/एनईएफटी या माध्यमातून देण्यात येईल. ही माहिती बंद लिफाफ्यात लेखी स्वरुपात समक्ष कार्यकारी अभियंता यांना देऊन त्यांची पोच नागरिकांनी घ्यावी. दिलेल्या माहितीवर तात्काळ कारवाई व तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज चोरीची माहिती थेट संचालक दक्षता व सुरक्षा यांना दुरध्वनीवरुन देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.


Comments

Top