HOME   लातूर न्यूज

विक्रांत गोजमगुंडे लातुरचे नवे महापौर

उप महापौरपदी भाजपाचे चंद्रकांत बिराजदार, युतीचा नवा पॅटर्न!


विक्रांत गोजमगुंडे लातुरचे नवे महापौर

लातूर: लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे निवडून आले तर उप महापौरपदी भाजपाचे चंद्रकांत बिराजदार यांची वर्णी लागली. सभागृहात ६८ नगरसेवक उपस्थित होते. त्यापैकी विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. कॉंग्रेसचे सचिन मस्के अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ३५ वर आले होते. त्यापैकी गिता गौड आणि चंद्रकांत बिराजदार यांनी आपला कौल विक्रांत यांना दिला. उप महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या भाग्यश्री कौळखेरे आणि चंद्रकांत बिराजदार यांच्यात लढत झाली. कौळखेरे यांना ३२ तर बिराजदार यांना ३५ मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सबंध प्रक्रियेचे संचलन केले. आयुक्त एमडी सिंह, उपायुक्त संभाजी वाघमारे, सतीश शिवणे यांनी त्यांना सहकार्य केले. निवडीपूर्वी भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांची, त्यांच्या सहकार्‍यांची उघड खलबते सुरु होती. ती प्रशासकीय अधिकारी, उपस्थित नगरसेवक आणि पत्रकारांनी याची देही याची डोळा अनुभवली.
हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौरांसाठी मतदान घेत आहोत अशी घोषणा जिल्हाधिकार्‍यांनी करताच वीज गेली! आता हे कुणासाठी शुभ आहे आणि कुणासाठी अशुभ असं जिलाधिकारी म्हणाले. महापौरपदासाठी देवीदास काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
विक्रांत यांना सहकार्य केल्याबद्दल चंद्रकांत बिराजदारांना प महापौरपद मिळालं. गिता गौड यांना स्थायी समितीच्या सभापतीपदाची लॉटरी लागू शकते अशी चर्चा उपस्थितात सुरु होती. जिल्हाधिकार्‍यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया लिलया पार पाडली.


Comments

Top