HOME   लातूर न्यूज

डिजीटल तंत्रज्ञान महिलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढवणारे

युट्यूब आणि गुगल सारख्‍यांना आपला गुरु बनविले पाहिजे- डॉ. गोपाळराव पाटील


डिजीटल तंत्रज्ञान महिलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढवणारे

लातूर: डिजीटल तंत्रज्ञान हे महिलांना एकिकडे स्‍वावलंबी बनवून त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी अत्‍यंत महत्‍वाचे आहे. यासाठी युट्यूब आणि गुगल सारख्‍यांना आपला गुरु बनविले पाहिजे तरच आपले जीवन सुखकर बनून आर्थिक सुबत्‍ता मिळवून देणारे ठरू शकते. म्‍हणून महिलांना डिजीटल तंत्रज्ञानाचा अवलंब व वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल तरच देशातील डिजीटल डिवाईड दूर होऊ शकेल असे विचार डॉ. गोपाळराव पाटील यांनी मांडले.
महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोग आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्‍या संयुक्‍त वतीने महिला डिजीटल साक्षरता अंतर्गत डिजीटल प्रशिक्षण एकदिवशीय कार्यशाळेच्‍या उद्घाटन प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास उद्घाटक म्‍हणून राज्‍य महिला आयोगाच्‍या माजी सदस्‍या आशाताई भिसे, प्रमुख अतिथी म्‍हणून माजी महापौर डॉ. स्मिता खानापूरे, माहिती सहसंचालक मीरा ढास, नगरसेविका सपना किसवे उपस्थित होत्‍या.
पुढे बोलताना त्‍यांनी महिला सक्ष्‍मीकरणाचे अनेक टप्‍पे पूर्ण झाले असून डिजीटल साक्षरतेचा हा टप्‍पा समाजातील अर्ध्‍या घटकांना सामाजिक सुरक्षिततेबाबतच श्रम, वेळ आणि पैसा वाचवणारे तंत्रज्ञान असून महिलांनी स्‍वंयम अध्‍ययनाद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे अव्‍हानही केले. उद्घाटक म्‍हणून बोलताना आशाताई भिसे यांनी डिजीटल तंत्रज्ञानाचा आपल्‍या जीवनात सुयोग्‍य वापर केला तरच महिलांच्‍या जीवनात आशादायी चित्र निर्माण होईल. यासाठी कोणत्‍या क्षणी कोणत्‍या गोष्‍टी कशा वापरल्‍या पाहिजे याचे ज्ञान व माहिती असणे आवश्‍यक आहे म्‍हणून महिलांनी तंत्रस्‍नेही बनत जास्‍तीत जास्‍त डिजीटल जीवन जगावे असे अव्‍हान केले.
यावेळी माजी महापौर डॉ. स्मिता खानापुरे, मीरा ढास यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. प्रास्तविक करताना प्राचार्य डॉ. महादेव गव्‍हाणे यांनी डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे उपलब्‍ध झालेल्‍या विविध प्रणालीद्वारे मानवासाठी सुविधा वाढत आहेत. शिवाय या सुविधा समाजाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे असल्‍यामुळे त्‍या आत्‍मसात केल्‍याशिवाय पर्याय नसल्‍याचे सांगितले. डॉ. आर. आर. लोंढे यांनी महिलांना स्‍वावलंबी बनवत समाजातल्‍या तंत्रस्‍नेही महिलांचे प्रमाण वाढवण्‍याकरीता ही कार्यशाळा आयोजित केल्‍याचे सांगितले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. ई. यु. मासूमदार, उपप्राचार्य प्रा. सुचेता वाघमारे, नगरसेविका रागिणी यादव यांच्‍यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील ३५० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्‍या होत्‍या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. प्रिती पोहेकर आणि अभिजित भांडवलकर यांनी केले. तर आभार प्रा. किरण प्रधान यांनी मानले.


Comments

Top