HOME   लातूर न्यूज

दोन हजार विद्यार्थी एकाचवेळी अनुभवणार सूर्यग्रहण

सामाजिक संस्थेच्या मदतीने लातूर महापालिकेचा अभिनव उपक्रम


दोन हजार विद्यार्थी एकाचवेळी अनुभवणार सूर्यग्रहण

लातूर: गुरुवार २६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण महापालिकेतील विद्यार्थ्यांना पाहता यावे या संकल्पनेतून महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने जिल्हा क्रीडा संकुलावर एकाचवेळी दोन हजार विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहता येणार असून त्यासाठी एमडीए फाउंडेशनच्यावतीने आवश्यक असणारे गॉगल आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चांद्रयान मोहिमेत सहभाग घेतलेले भारतीय विज्ञान प्रसारक पराग गोरे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.
गुरुवारी सकाळी ०८ ते ११ या कालावधीत सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना इजा होऊ शकते. उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहता येत नाही. ग्रहण म्हणजे नेमके काय? ते कसे घडते? याची माहितीही शालेय विद्यार्थ्यांना असत नाही. ही माहिती देण्यासोबतच विद्यार्थ्यांना ग्रहण पाहता यावे यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी एमडीए फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम आयोजित केला आहे.
सकाळी ७ वाजता या अभिनव उपक्रमास प्रारंभ होणार आहे. आ. अमित देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या कार्यक्रमास भारतीय विज्ञान प्रसारक आणि इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेत विद्यार्थीदशेत सहभाग नोंदवणारे पराग गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त एम डी सिंह, एमडीएम फाउंडेशनचे अध्यक्ष महेश आंबेकर, दिनेश आंबेकर या उपक्रमाचे समन्वयक ओमप्रकाश झुरुळे, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउनचे अध्यक्ष शशिकांत मोरलावार, पालिकेचे शिक्षणाधिकारी डीएच सोनफुले, एमडीएम आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या प्राचार्य श्वेता गिल, रोटरीचे सचिव वीरेंद्र फुंडीपल्ले व कपिल पोकर्णा यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दहा वर्षांपूर्वी असे ग्रहण झाले होते. यापुढे जवळपास ३० वर्षांनी कंकणाकृती ग्रहण होणार आहे. त्यामुळे हा दुर्मिळ योग असणार आहे. महापालिकेच्या २१ शाळांमधील १०६० विद्यार्थ्यांना हे ग्रहण पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासोबतच एमडीए इंटरनॅशनल स्कूलचे ६०० विद्यार्थी व ४०० पाहुण्यांसह जवळपास ०२ हजार विद्यार्थी व नागरिक एकत्रितरित्या हे ग्रहण पाहू शकणार आहेत. यासाठी एमडीए फाउंडेशनने सिल्वर पॉलिमर फिल्मचे विशिष्ट गॉगल उपलब्ध करून दिले आहेत. या गॉगलमुळे ९९.९ टक्के सूर्यप्रकाश दिसत नाही. आयएसओ सर्टिफाइड असणाऱ्या या गॉगलमुळे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासूनही डोळ्यांचे रक्षण होते.


Comments

Top