HOME   लातूर न्यूज

वीज पुरवठ्याच्या समस्या महिनाभरात मिटवा

कुणी पैसे मागितल्यास थेट संपर्क करा- आ. अभिमन्यू पवार


वीज पुरवठ्याच्या समस्या महिनाभरात मिटवा

औसा: वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी.शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये .वीजपुरवठ्यासंदर्भात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचे एक महिन्याच्या कालावधीत निराकरण करावे,अशा सूचना आ.अभिमन्यू पवार यांनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या .अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही कामासाठी पैसे मागितले तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. औसा येथे प्रशासकीय इमारतीत आयोजित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आढावा बैठकीत आ. अभिमन्यू पवार बोलत होते. या बैठकीस विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता आरआर कांबळे, अधिक्षक अभियंता मंदेश माने, औसा अभियंता अभियंता पीएन दुधाळे, निलंगा विभागाचे अभियंता विष्णू ढाकणे, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक सुनील उटगे, संतोष मुक्ता, संजय कुलकर्णी आदीसह संबंधित गावातील सरपंच, शेतकरी यांच्यासह त्या- त्या गटातील संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, यावर्षी पावसाळा संपत असताना झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. परंतु वीज नसल्यामुळे हे पाणी पिकांना देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जाणारा संताप सहाजिक आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. काही अडचणीमुळे शेतकरी संताप व्यक्त करीत असतील हे समजून घेत त्यांची पिळवणूक करू नये. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कामांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली पडलेल्या आहेत, खांब वाकलेले आहेत. ट्रांसफार्मर जळाले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. याकडे लक्ष देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ते तात्काळ दुरुस्त करावेत असे आ. पवार म्हणाले. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक तेथे सौर ऊर्जा प्रकल्प व उपकेंद्र निर्मितीसाठी आपण पाठपुरावा करू. या प्रकल्पासाठी जी आवश्यक मदत लागेल ती करू असे आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीत ज्या समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या त्यांचे निराकरण झाले की नाही याचा फेरआढावा आपण पुढील बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रबी हंगाम संपेपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून शेतकऱ्यांच्या समस्या वेळेत सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. या बैठकीस कासार बालकुंदा, मदनसुरी, औराद, कासारशिरसी, सरवडी, हासेगाव, आलमला, खरोसा, लामजना, किल्लारी, मातोळा आशिव, उजनी, भादा आणि औसा शहर या गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top