HOME   लातूर न्यूज

२०१९ पर्यंत एकही नागरिक बेघर राहणार नाही!

ग्रामस्वराज्य अभियानाचा खा. सुनील गायकवाडांच्या उपस्थितीत समारोप


२०१९ पर्यंत एकही नागरिक बेघर राहणार नाही!

लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे १४ एप्रिल ते ०५ मे या कालावधीत लातूर लोकसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या ग्रामस्वराज्य अभियानाचा समारोप कंधार तालुक्यातील राऊतखेडा येथे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील चार वर्षांत ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना त्यांनी यावेळी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील चार वर्षांच्या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या. त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या की नाही, याचा आढावा घेण्यासाठी १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत मतदारसंघातील विविध गावांमध्ये जावून डॉ. सुनील गायकवाड यांनी बैठका घेऊन सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. यातील अनेक योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे सुनील गायकवाड यांच्या लक्षात आले. ज्या योजनांचा लाभ अद्यापपर्यंत नागरिकांना मिळाला नाही, त्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना डॉ. गायकवाड यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. केंद्र सरकारने मागेल त्याला घर, जनधन योजना, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना, उज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, सौभाग्य योजना, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मागेल त्याला शौचालय अशा योजना सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, कोणीही लाभार्थी यापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याचा समारोप कंधार तालुक्यातील राऊतखेडा येथे करण्यात आला. यावेळी डॉ. सुनील गायकवाड यांनी मागील चार वर्षांत सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेऊन २०१९ पर्यंत एकही नागरिक बेघर राहणार नाही, अशी व्यवस्था सरकारने केली आहे. त्यासाठी गरजवंतांनी घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राऊतखेडा या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावाला जोडणारे सर्व रस्ते आगामी काळात नव्याने बनवण्यात येणार आहेत. राऊतखेडा हे गाव लातूर लोकसभा मतदारसंघातील शेवटचे गाव नसून ते पहिले गाव आहे, या गावापासून विकासाची गंगा सुरू होणार आहे. गावातील स्मशानभूमीसाठी शेड बांधून देण्याचे आश्‍वासन डॉ. गायकवाड यांनी दिले.


Comments

Top