HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्यात ४६ अपघात प्रवण क्षेत्र, ३१ ब्लॅक स्पॉट

सडक सुरक्षा समितीची बैठक, जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०० अपघात


लातूर: लातूर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नव्याने स्थापन झालेली सडक सुरक्षा समिती यावर नियंत्रण आणणार असून आज या समितीची बैठक झाली. पोलिस, आरटीओ आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यात ४६ अपघात प्रवण क्षेत्र असून ३१ ब्लॅक स्पॉट ठरवण्यात आले आहेत अशी माहिती खा. सुनील गायकवाड यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारत सरकारने दोन महिन्यांपूर्वी जिल्हा निहाय सडक सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष त्या त्या जिल्ह्यातील खासदार असून सचिव आरटीओ असतात. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रमुख अधिकारी या समितीचे सदस्य असतात. लातुरच्या समितीची बैठक आज झाली. ही देशातली पहिली बैठक असल्याची माहिती खा. सुनील गायकवाड यांनी दिली. आजच्या बैठकीत अपघात कमी करण्याबात चर्चा झाली. काही सूचना आणि प्रस्तावही आले. अपघात प्रवण भागात मदत व्हावी यासाठी पोलिस, डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिकांची तात्काळ व्यवस्था व्हावी. अपघात प्रवण क्षेत्रात फलक लावाववेत यांचा त्यात समावेश होता. लातूर जिल्ह्यात २०१४ साली ६८७ अपघात झाले त्यात २६८ मृत्यू झाले, २०१५ मध्ये झालेल्या ६१९ अपघातात २५० जणांचा जीव गेला, तर २०१६ सालात ६०० अपघातात १८ जणांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०० अपघात होतात. ५० टक्के अपघात खराब रस्ते, तीव्र वळणे, वेग मर्यादांचे उल्लंघन करणे यामुळे होतात. पोलिस, आरटीओ आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यात ४६ अपघात प्रवण क्षेत्र असून ३१ ब्लॅक स्पॉट ठरवण्यात आले. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणार्‍यांचे परवाने रद्द केले जातील. मान्यतेपेक्षा अधिक प्रवासी नेणार्‍यांनाही सोडले जाणार नाही अशी माहिती खासदारांनी दिली.


Comments

Top