HOME   टॉप स्टोरी

लातूर लोकसभेला मातंग उमेदवार द्या

मातंग परिषदेच्या वतीने कॉंग्रेसकडे अशोकराव काळे यांची मागणी


लातूर: राखीव असणार्‍या लातूर लोकसभा मतदारसंघात मातंग समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मातंग परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव काळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. आपले म्हणणे मांडताना अशोकराव काळे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत हा समाज उपेक्षित आहे. राज्यात मातंग समाजाची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास असून लातूर मतदारसंघात एक ते दीड लाख समाज आहे. हा समाज प्रारंभापासून कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. असे असतानाही पक्षाने जयवंतराव आवळे यांच्यासारख्या बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली. नंतरच्या निवडणुकीतही मातंग समाजाला डावलण्यात आले. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघासाठी स्थानिक ५५ उमेदवारांनी कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केली आहे. यापैकी मातंग समाजाला प्रतिनिधीत्व देऊन आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणीही अशोकराव काळे यांनी केली. पक्षाने आपल्या नावाचा विचार केला नाही तर जो उमेदवार पक्ष देईल त्याच्यासाठी काम करून त्याला निवडून आणू असेही ते म्हणाले.
काथवटेंची शिफारस
यावेळी बोलताना अशोकराव काळे यांनी हिंदू खाटिक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा कॉंग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष जयंतभाऊ काथवटे यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. मला उमेदवारी देताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या जागेवर काथवटे हे एकमेव पर्याय आहेत. सर्वच बाजुंनी जयंतभाऊ काथवटे हे सक्षम आहेत. सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. १९७८ पासून आजपर्यंत ते पक्षाचे काम करीत आले आहेत. मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे ते देखील लातूर मतदारसंघाचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करू शकतात, असा दावा अशोकराव काळे यांनी केला. यावेळी बन्सी जोगदंड, माणिक पवार, नवनाथ उपळेकर आणि कुंडलीक गव्हाणे उपस्थित होते.


Comments

Top