HOME   टॉप स्टोरी

सर्वात अधिक टॅंकर्सची मागणी लातुरात- पालकमंत्री

दुष्काळाशी दोन हात करण्यास प्रशासन तयार


लातूर: लातूर जिल्ह्यात सर्वात अधिक टॅंकर्सची मागणी लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये आहे. त्याला कोण जबाबदार आहे असा सवालही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. असे असले तरी दुष्काळाशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्याचे आदेश सर्व पालकमंत्र्याना दिले आहेत. याच अनुषंगाने लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी सर्व अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळ पाहणी दौरा करण्याचे आदेश दिले. देशात आदर्श आचारसंहिता लागू असून यामुळे दुष्काळ जाहिर करण्यास अडचण होत आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथील करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लातूर जिल्ह्याला २०१६ साली भीषण दुष्काळाच्या झळा बसल्या. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन तयारी करत आहे. लातूर जिल्ह्यात सध्या ४५ टॅंकर्स चालू आहेत आणि येणार्‍या काळात अजून याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे प्रशासन तयारी करीत आहे. लातूर शहर आणि जवळपासच्या गावामध्ये पाणी टंचाईची प्रखरता जास्त जाणवत आहे त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चारा छावण्याची गरज आहेत या बाबींवर लवकरात लवकर उपाय योजना केल्या जाणार असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन ईटनकर, पोलिस निरीक्षक रांजेद्र माने यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Comments

Top