HOME   टॉप स्टोरी

अभय साळुंकेंवर पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव करण्याची वेळ का आली?

यशवंत सिन्हा, बच्चू कडू, राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांनाही लिलावासाठी बोलावलं


लातूर: निलंग्यात वेगळंच रान पेटलं आहे. शिवसेना सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्री आणि भाजप सरकारविरुद्ध दंड ठोकले आहेत. दिवसेंदिवस शेतकर्‍यांवरील अन्यायात वाढ होते आहे. ४८०० भावानं विकलं गेलेलं सोयाबीन आज २४०० वर आलं आहे. बियाणे, मशागत, काढणी, मजुरी वाढली आहे. मजुरी दुप्पट वाढली पण सोयाबीनचा भाव मात्र अर्ध्यावर आला आहे. भाजपवाले विरोधात असताना सोयाबीनला ५५०० चा भाव मागत होते. एवढाही भाव जाउ द्या आहे तो तरी ठेवायला हवा होता असं अभय सांगतात. खरीप गेले, रबी नीट करावी म्हटलं तर वीज गायब असते, सरकारने पूर्णवेळ वीज द्यायला हवी. विरोधात असताना याच संभाजी पाटलांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. सरकारची धोरणं आणि संभाजीरावांचं वागणं याच्या निषेधार्थ २१ डिसेंबरला निलंग्याच्या शिवाजी चौकात त्यांच्या खुर्चीचा लिलाव करणार आहोत. या लिलावात सहभागी होण्यासाठी आजवर १८०० शेतकर्‍यांनी प्रत्येकी १०० रुपयांची पावती फाडली आहे. कॉंग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेका यांनीही पावती फाडली, राजू शेट्टी, बच्चू कडू, यशवंत सिन्हा आणि रघुनाथदादा पाटील यांनाही लिलावासाठी बोलावले आहे. झाडाला टांगून आत्महत्या करण्यापेक्षा आपलं दु:ख वेशीवर टांगायचंय असंही अभय साळुंके म्हणतात.
अभय यांच्या या आंदोलनाला निलंग्यात जोरदार प्रतिसाद मिळतोय. आपलं दु:ख जगजाहीर करण्यासाठी शेतकर्‍यांना उमदा नेता मिळाला आहे असं जाणकार सांगतात.


Comments

Top