HOME   टॉप स्टोरी

दहावी: लातूर पुन्हा सातव्या क्रमांकावर, कोकण टॉप

यंदाही राज्याचा निकाल कमी, २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, त्यात लातुरचे १६


लातूर: आज बहुप्रतिक्षित दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्याचा निकाल १२.२१ टक्क्यांनी घसरला आहे. यंदा तो ७७.१० टक्के इतका नोंदला गेला. त्यातल्या त्यात पॅटर्नवाला लातूर विभाग राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. बारावीतही लातूर विभाग सातव्या क्रमांकावरच होता. ही गुणवत्ता लातूर विभागाने पुन्हा ‘मेंटेन’ केली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला. ८८.३८ टक्के एवढी कमाई कोकणने केली. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूरच्या पदरात केवळ ६७.२७ टक्क्याचे माप पडले. यंदाही मुलींनीच बाजी मारली. राज्यातून १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातून २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. त्यात लातूर विभागाच्या १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लातूर विभागातील तीन जिल्ह्यातून एक लाख ०७ हजार २९१ जणांनी परिक्षा दिली. त्यापैकी ७८ हजार १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचे प्रमाण ७२.८७ टक्के इतके आहे. लातूर विभागातील नांदेडचा निकाल सर्वात कमी ६८.१३ टक्के, उस्मानाबादचा निकाल ७२.१७ तर विभागात सर्वाधिक निकाल ७८.६६ टक्के लातूर जिल्ह्याने नोंदवला आहे. लातूर विभागाने २००८ साली ८७.९४ टक्के इतका विक्रमी निकाल नोंदवला होता.पुढे २०१५ मध्ये ८६.३८ टक्क्यावर आला. मागच्या वर्षी तो ८६.३० टक्के इतका होता. यंदा हा टक्का १३.४३ ने घसरला. यंदा तो ७२.८७ टक्क्यावर स्थिरावला.


Comments

Top