HOME   टॉप स्टोरी

९५२५ नळ जोडण्या अमृतच्या गुत्तेदाराकडून त्याच्या खर्चातून जोडून घेणार

बनावट पावतीबुकांचा खुलासा गुत्तेदाराने केल्यावरच पोलिस कारवाईचा निर्णय


लातूर: अमृतचं पाणी लातुरकरांना सहजासहजी पचेल असं आज तरी दिसत नाही. काम पूर्ण होईपर्यंत मात्र लातूरकरांना पाण्याऐवजी हलाहल पचवावं लागणार आहे. अमृतच्या पाईपलाईन टाकताना घेतलेल्या खड्ड्यांमुळं हजारो नळ कनेक्शन्स तुटली. ही सुमारे ९५२५ कनेक्शन्स अमृतच्या गुत्तेदाराकडून त्याच्या खर्चातूनच जोडून घेणार आहोत अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी आजलातूरशी बोलताना दिली.
गुत्तेदार करारातल्या अटी पाळत नाही
अमृतची कामे अतिशय संथ गतीने चालू होती. आठ महिन्यात केवळ १२ टक्के काम झालं होतं. याबद्दल ओरड सुरु झाली तेव्हा नगरसेवक, अधिकारी आणि माध्यमांच्या दट्ट्यामुळं ७९ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं काम झालं. पण त्यातही आम्ही समाधानी नाही. अजून ६९ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं काम बाकी आहे. एकूण १२८ किलोमीटर पाईपलाईन टाकायची आहे. मात्र चार महिन्यात ७९ किलोमीटर पाईपलाईनचं काम वेगानं करुन घेतलं. अमृतच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे. दोन जीव गेले, तिघांचे हातपाय मोडले. अमृतचा गुत्तेदार करारातल्या अटी पायदळी तुडवत आहे याची कबुली गोविंदपूरकर यांनी दिली.
गुत्तेदारावर होऊ शकते पोलिस केस
ज्यांच्या नळजोडण्या पूर्ववत करुन द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी मनपाचे नाव वापरुन अमृतवाल्यांनी परस्पर पावती बुके छापून घेतली. हे काम गैरच आहे. छापून देणार्‍या प्रेसचं शपथपत्र, किती बुकं छापली, किती पावत्या फाडल्या, ही बुकं का छापली याबाबतची नोटीस अमृतच्या गुत्तेदाराला दिली आहे. आज त्याचा खुलासा यायचाय. तो समाधानकारक असेल तर ठीक अन्यथा त्याच्यावर पोलिस केस केली जाणार आहे असेही गोविंदपूरकर यांनी सांगितले.
तात्या काटेरी कुंपणावर!
मनपाची सत्ता भाजपाकडे आहे. पण स्थायीचं पद कॉंग्रेसचे गोविंदपूरकर यांच्याकडे आहे. चांगलं काम करावं तर भाजपवाले आडवे येतात, नाही करावं तर पक्ष नाराज होतो अशी त्यांची अवस्था झाली आहे. तरीही आजवर त्यांनी या स्थायीच्या खुर्चीवर उर्फ काटेरी कुंपणावर बसून नीटपणे कारभार चालवला आहे. उर्वरीत काळात हे कुंपण काय करामत दाखविल ते पहावं लागेल!


Comments

Top