HOME   टॉप स्टोरी

बॅंक ऑफ महाराष्ट्रने काढून घेतली सुरक्षा व्यवस्था!

खर्च कपातीचे कारण, असुरक्षितता वाढणार, कर्मचार्‍यांची निदर्शने


लातूर: खर्चात होणारी वाढ कमी करण्याचे कारण देत बॅंक ऑफ महाराष्ट्रने बॅंकांच्या शाखातील आणि एटीम केंद्रातील सुरक्षा काढून घेतली आहे. मुळातच बॅंका आणि एटीएममध्ये गुन्हेगारी वाढली आहे, ग्राहक आणि कर्मचार्‍यांची असुरक्षितता वाढली आहे. अशा स्थितीत सुरक्षा वाढवण्याऐवजी सुरक्षाच काढून घेण्यात आली. याचा निषेध म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या लातूरच्या सदस्यांनी औसा मार्गावरील विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. विविध फलक हाती घेऊन हे कर्मचारी सुरक्षेची मागणी करीत होते. सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशी माग्णी करण्यात आली. या कर्मचार्‍यांनी व्यवस्थापकांना निवेदनही दिले. काही निवडक शाखांना सुरक्षा प्रदान करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
वाढत्या तोट्याच्या ओझ्याखाली दबलेल्या बॅंकांनी कर्जवसुली करुन तोटा भरुन काढण्याऐवजी खर्च कपातीचे कारण पुढे करुन ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. महाबॅक व्यवस्थापनाने अचानक व तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे बॅंकातील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा व्यवस्थापनाने पुनर्विचार करावा अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे. या आंदोलनाला विविध बॅंक कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.


Comments

Top