HOME   टॉप स्टोरी

रिकाम्या घागरीत आश्वासनांचे पाणी!

पत्रकार जगताप पाणीप्रश्नी भेटले आमदारांना, आश्वासन घेऊन निघाले परतपावली!


लातूर: रवींद्र जगताप. आजलातूरचे संपादक. सावेवाडीच्या त्रिमुर्तीनगरात राहतात. नगरसेवक अशोक गोविंदपुरकरांनी बांधलेल्या अपार्टमेंमध्ये. या अपार्टमेंटमध्ये तात्यांचे निकटवर्तीयही राहतात. हे अपार्टमेंट, त्याच्या बाजुची घरे, समोरची घरे, अशा १४ घरांना मागच्या साडेचार महिन्यांपासून पाणी येत नाही! अनेकदा तक्रारी झाल्या. २०-२५ वेळा मनपाचे अभियंते आले, पाहणी करुन गेले, काहीच झाले नाही. या प्रभागात अशोक गोविंदपुरकर, रेहाना बासले, राजा मनियार आणि सपना किसवे आदी चार नगरसेवक आहेत. जेव्हा जेव्हा पाण्याची समस्या येते, तेव्हा तेव्हा बासले येतात, प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करतात तरीही काहीच होत नाही.......ही झाली मागची स्टोरी. आज काय घडलं?
आज सकाळी लातुरचे आमदार अमित देशमुख अशोक गोविंदपुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्यांची भेट संपल्यानंतर जगताप यांनी रिकामी घागर घेऊन आमदारांची भेट घेतली. सगळ्या प्रश्नांचं कथन केलं. टंचाईग्रस्त घरे असलेल्या भागाला भेट देण्याची विनंती केली. पण पुढच्या अपॉइंटमेंटमुळे त्यांना जावं लागलं. जाता जाता तुमचा प्रश्न गोविंदपुरकरांना सांगितला आहे, इथं घागर घेऊन येण्यापेक्षा महानगरपालिकेत जा, मीही येईन असा मलम लावून ते गेले! तोपर्यंत बिचार्‍या जगतापांची रिकामी घागर आश्वासनांच्या पाण्यामुळे बरीच जड होऊन बसली होती! जड अंत:करणाने त्यांनी ती घरी पोचवली!


Comments

Top