HOME   टॉप स्टोरी

लिंगायत स्मशानभुमीच्या कामात आणले अडथळे!

पुन्हा अडचणी आणाल तर खबरदार, तुमचेही कागद काढू शकतो- पालकमंत्री


लातूर: महापालिका निवडणुकीच्या दरम्यान लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. हा प्रश्न सोडविताना अनेक अडचणी व तांत्रिक मुद्दे समोर आल्यामुळे उशीर झाला. परंतु यातून प्रशासनाच्या मदतीने योग्य मार्ग काढून हा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे आगामी काळात ही स्मशानभूमीसारख्या जिल्हाळयाच्या प्रश्नात कोणीही
राजकारण करु नये, अनेकांनी अनेक कागद काढून आडवे येण्याचा प्रयत्न केला. हे सामाजिक काम आहे. असे काही करु नका अन्यथा आम्हालाही हवे ते कागद काढता येतात. याला प्रेमाचा संदेश समजा किंवा चेतावणी समजा असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बजावले.
कन्हेरी रोड येथील सर्व्हे नंबर ४५ येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त एमडी सिंह, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायी समिती सभापती ॲड. दीपक मठपती, परिवहन सभापती मंगेश बिराजदार, शैलेश लाहोटी, अजित पाटील कव्हेकर, गुरुनाथ मगे, सुनील मलवाड, जयश्री पाटील, सरीता राजगीरे, भाग्यश्री शेळके, उपायुक्त संभाजी वाघमारे, शहर अभियंता दिलीप चिद्रे, रागीनी यादव, शोभा पाटील. भाग्यश्री कौळखोरे, अजित पाटील कव्हेकर, परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक, राजा राचट्टे, उदय कुमार चौंडा, लक्ष्मीकांत मंटाळे, भानूदास डोळे, बसवंत भरडे, केदार रासुरे उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मागील १७ वर्षापासून रखडलेला होता. तो प्रश्न आज निकाली निघाला परंतु या कामामध्ये ही अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला. अशा सामाजिक व जिव्हाळयाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये. तसेच स्मशानभूमीचे लोकार्पण करुन हे काम करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्हयाच्या विविध विकास कामातील अडथळे सोडवून लातूर जिल्हयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे शासन कटीबध्द आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला असे सांगून लातूर जिल्हयाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. समाजातील सर्व नागरिकांनी महात्मा बसवेश्वराचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून सामाजिक भावना जोपासली पाहीजे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून लातूर महापालिकेला जीएसटी चे वाढीव अनुदान मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापौर पवार यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केला. तर महापालिका आयुक्त एमडी सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर वीरशैव लिंगायत स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते वृक्षरोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत कोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन रामदास भोसले यांनी केले.


Comments

Top