HOME   टॉप स्टोरी

टिप्पर अपघातात शिक्षकाचा मृत्यू, रेणापूर नाका मृत्यूचा सापळा

गतीरोधक तर नाहीतच, सिग्नल यंत्रणा मृतावस्थेत, मनपा ना पोलिस, वालीच नाही


लातूर: आज दुपारी साडेचारच्या सुमारास नवीन रेणापूर नाक्यावर टिप्परखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव श्रीपाद दिंडोरे असल्याची माहिती मिळाली. ते रेणापुरच्या आश्रम शाळेत काम करीत असत. याच भागातील केशवनगरात त्यांचे घर आहे. त्यांच्या पत्नीही शिक्षिका आहेत असे सुत्रांनी सांगितले. ते स्कूटरवरुन जात असताना हा प्रकार घडला. सुमारे दोन ते अडीच तास काही कार्यकर्त्यांनी दिंडोरे यांच्या प्रेताला पोलिसांना हात लावू दिला नाही. या चौकातील सिग्नल यंत्रणा सुरु करा आणि गतीरोधक बसवा अशी मागणी सातत्याने करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संध्याकाळी सातच्या सुमारास दिंडोरे यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आला.
लातूर-अंबाजोगाई मार्गावरील नवीन रेणापूर नाक्याचा चौक अतिशय अरुंद होत चाललाय. वाढती रहदारी आणि अतिक्रमणांमुळे वाहने अडचणीत सापडत आहेत. परिणामी सतत अपघात होत असतात. या चौकात कौतुकाने सिग्नल यंत्रणा बसवली खरी पण ती कधीच चालू नसते. एकीकडून रेल्वे स्टेशनहून येणारा रस्ता, दुसरा साई मार्ग, तिसरा रेणापूर मार्ग, चौथा सिद्धेश्वर आणि नांदेडकडून येणारा पर्यायी मार्ग शिवाय शिवाजी चौकातून येणारी वाहतूक असा ताण हा चौक सहन करीत असतो. यामुळे सातत्याने अपघात होत असतात.


Comments

Top