HOME   टॉप स्टोरी

उद्या आरोग्याचा महायज्ञ, ३० हजार रुग्ण घेतील लाभ

लोकनेते विलासरावांना आदरांजली, २०० आरोग्य शिबिरात एक हजार डॉक्टरांचं योगदान


लातूर: उद्या १४ ऑगस्ट लोकनेते विलासराव देशमुख यांचा स्मृतिदिन. या निमित्ताने २०० रुग्णालयात आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात किमान एक हजार डॉक्टर आपलं योगदान देतील. त्याचा लाभ किमान तीस हजार रुग्ण घेतील अशी अपेक्षा डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुखही उपस्थित होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स आपलं योगदान देतात याचा अभिमान वाटतो. साहेबांप्रमाणेच तेही सामान्यांची काळजी घेतात असं समाधान वैशालीताई देशमुख यांनी व्यक्त केलं.
स्मृतीदिना निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा, इंडीयन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेली आणि आर्थिक क्षमता असलेली मंडळी दरवर्षी रूग्णालयात जाऊन वेगवेगळया तपासण्या करून घेतात. परंतु ज्याच्याकडे आर्थिक क्षमता नाहीत अशा मंडळींनाही आपल्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेण्याची सोय आदरणीय विलासराव देशमुख आरोग्य शिबीरामुळे झाली आहे. दरवर्षी नियमीतपणे हे शिबीर होत असल्याने सर्वांनी १४ ऑगस्ट ही तारीख लंक्षात ठेऊन आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी केले. २०१४ साली ५००० रुग्णांनी, २०१५ या वर्षी ७५०० रुग्णांनी तर २०१६ या वर्षी १०००० रुग्णांनी, सन २०१७ या वर्षी १८,००० रुग्णांनी, सन २०१८ या वर्षी २०,००० रुग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबीरात सहभागी झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीराची तयारी केली असून रुग्णांची नोंदणीही सुरु केली आहे. या आरोग्य शिबिराच्या लातूर शहर व परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमित देशमुख, संयोजक तथा इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव डॉ. संतोष ढोपे, डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. दीपक गुगळे, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. रमेश भराटे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. शिरीष पाटील, डॉ. वर्धमान ऊदगीरकर, डॉ. चेतन सारडा, डॉ. अभय कदम, डॉ. देशमुख, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दयानंद मोटेगावकर, डॉ. विनोद कोराळे, डॉ. मनोज देशमुख, डॉ. पवन लडडा, इंडीयन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विष्णू भंडारी, डॉ. नितीन शितोळे, डॉ. सतिश बिराजदार, डॉ. सेवानंद दाडगे, होमिओपॅथीक असोसिएशनचे डॉ. संजय गव्हाणे, डॉ. पुरुषोत्तम दरक यांच्यासह सहभागी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Comments

Top