HOME   टॉप स्टोरी

भाजपाच्या मुलाखतींसाठी विश्रामगृहावर शक्ती प्रदर्शन

लोणीकरांनी घेतल्या मुलाखती, कव्हेकरांना वरुन सिग्नल, लागले कामाला!


लातूर: विधानसभा निवडणुकीसाठी एक दोन मतदारसंघातील दोन तीन उमेदवार वगळता बाकी ठिकाणचा आणि पक्षांचा अजून नीटसा अंदाज आलेला नाही. आज पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातुरच्या विश्रामगृहावर दाखल झाले. ते इच्छुकांना भेटत आहेत, मुलाखतीही सुरु होते. ग्रामीण मतदारसंघातुन इच्छूक असलेले रमेश कराड यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येनं गाड्यातून विश्रामगृहावर आणले. अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील, आधीच हजर होते. बबनराव लोणीकरांच्या पाठोपाठ पालकमंत्री संभाजीराव पाटील, गोविंद केंद्रेही हजर झाले. मुलाखतींपूर्वी बहुतेकांनी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला.
अजित भैय्यांना वरुन ‘शिगनल’ आलाय!
परवापर्यंत शांत असणारे अजित पाटील कव्हेकर एकदम पिक्चरमध्ये आलेत. शहर मतदारसंघातील ग्रामीण भागात त्यांनी बैठका घेणं सुरु केलं आहे. आज अन उद्या सण असल्यानं ते लातुरातच आहेत. परवापासून पुन्हा दौरे सुरु होतील. त्यांना वरुन शिग्नल आलाय. वरच्या यादीत त्यांचं नाव आहे. संभाजीभैय्यानीबी त्यांना कामाला लागा असं सांगितलंय अशी माहिती खात्रीच्या सुत्रांनी दिली.
विश्रामगृहावर जत्रा
आज भाजपच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातुरात आले. विश्रामगृहावर मतदारसंघनिहाय मुलाखती सुरु होत्या. अहमदपूर आणि उदगीरमधून अधिक गर्दी आहे. जवळपास सर्वच मतदारसंघातून किमान १५ जण भाजपाकडून लढण्यास उत्सुक आहेत. रमेश कराड, प्रकाश पाटील या ग्रामीण मधील उत्सुकांनी समर्थकांसह गाड्याघोड्यांसह गर्दी केली होती. काल रात्री अचानक अ‍ॅड. दिग्विजय काथवटेंना उदगीरसाठी ‘मेसेज’ आला. तेही लोणीकरांकडे मुलाखतीसाठी बोलावण्याची प्रतिक्षा करताना दिसले. सर्वात शेवटी लातूर मतदारसंघासाठी मुलाखती होणार असल्यानं अनेकजण ताटकळताना दिसले. अनेक इच्छुकांनी समर्थकांना भरुन आणलेल्या गाड्या विश्रामगृहासमोर रांगेत उभ्या होत्या.


Comments

Top