HOME   टॉप स्टोरी

मंदी सरकारने आणली, पाच वर्षे जाणार नाही!

वंचितांना अडचणीतच ठेवण्याचा सरकारचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप


लातूर: धर्माच्या नावावर सत्तेत आलेल्या या सरकारला या मतांचा आदर करता आला नाही. मंदीमुळं देश पिचतोय, ही मंदी सरकारनेच आणली. ती पुढची पाच वर्षे जाण्याची शक्यता वाटत नाही. वंचितांना सत्तेत येण्याची संधी मिळू नये, यासाठी वंचितांना सतत अडचणीत ठेवण्याचा डाव सरकार खेळतंय. देशात मुबलक कापूस पिकत असताना कमी दरातला अमेरिकन कापूस आणला जातो, इथला शेतकरी नागवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. हे सरकार जोपर्यंत राहील तोपर्यंत मंदी राहणार आहे असा स्पष्ट आरोप करीत बॅंकातल्या ठेवीही आता सुरक्षित नाहीत. या ठेवींवर बॅंका ठेवींएवढीच हमी द्यायच्या. आता कोटीला बॅंका एक लाखाचीच हमी देणार आहेत. तसं रिझर्व बॅंकेनं आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. नागपुरहून निघालेली वंचितची सत्ता संपादन रॅली आज लातुरात आली. या निमित्ताने टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.
लोकसभेच्या तिनशे ते तिनशे चाळीस जागा मिळतील असा दावा निवडणुकीआधीच सरकार कसे करु शकते? एवढी कोणती चांगली कामे केली? आता विधानसभेत २४० जागा येतील असं मुख्यमंत्री म्हणतात, ते काय भविष्यकार आहेत? इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळे करुन ही सरकारे आली. शिक्षण, सत्ता, समाजकारण, समाज यापासून दूर राहिलेला म्हणजे वंचित. अतिशय योग्य शब्द प्रकाश आंबेडकरांनी निवडला. त्याच्यावर परदेशातही संशोधन सुरु आहे. आंबेडकरांनी जाती अंताची लढाई सुरु केली. लोकसभा निवडणुकीत अतिशय पिडीत-वंचितांच्या उमेदवारांना संधी दिली. ३७० वंचित जातींचं नेतृत्व आंबेडकर करीत आहेत असे अण्णाराव पाटील म्हणाले. या सभेला मोठी गर्दी झाली होती. प्रकाश आंबेडकरांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते, लातुरचा उमेदवार आज घोषित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आंबेडकरांना वेळ कमी मिळाल्याने भाषण आटोपते घ्यावे लागले.


Comments

Top