HOME   टॉप स्टोरी

पालकमंत्र्यांच्या खुर्चीची किंमत ४५ हजार रुपये! घेतली छावाने

निलंग्यात तणाव, अफवांचं पीक, राजकीय फायद्याच्या खेळाचा सामना


लातूर: निलंगावासियांनी पालकमंत्री आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खुर्चीचा भाव ४५ हजार रुपये ठरवला. भर शिवाजी चौकात झालेल्या लिलावात ही खुर्ची छावाचे विजयकुमार घाडगे यांनी पटकावली. या लिलावासाठी शिवाजी चौकात स्टेज उभारण्यात आले होते. रघुनाथदादा पाटील, सत्तार पटेल, विजयकुमार घाडगे, राजेंद्र मोरे, राजकुमार सस्तापुरे, अरुण कुलकर्णी, काकासाहेब जाधव, अभय साळुंके आणि त्यांचे कार्यकर्ते हजर होते. या लिलावाला दोन्ही शेतकरी संघटना, महाराष्ट्र विकास आघाडी, छावा, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड यांनी पाठिंबा दिला. अशोकराव पाटील निलंगेकरांनी लिलावासाठी १०० रुपयांची अनामत पावती फाडली होती पण ते हजर नव्हते, राष्ट्रवादीचंही कुणी दिसलं नाही. खुर्चीची बोली पाच हजारापासून सुरु झाली. पुढे ती ११ हजारावर गेली. ११ वरुन थेट २१ हजारावर गेली, पुढे २६ हजाराचा पुकारा झाला. मग ३१ हजाराचा भाव आला. पुढे ३६ वरुन ४० चा भाव आला. अखेर ४५ हजार रुपयांवर बोली फायनल झाली. ही बोली छावाचे विजयकुमार घाडगे यांनी लावली. कारच्या वर ही खुर्ची ठेऊन वाजत गाजत नेण्यात आली!
या लिलावानंतर जमलेला सगळा समुदाय रघुनाथदादा पाटील आणि अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात गेला. यावेळी पाटील यांनी कार्यकारी अभियंत्याशी चर्चा केली. सक्तीची वसुली करु नये, तोडलेले कनेक्शन जोडावेत अशी मागणी त्यांनी केली. या लिलावाला निलंग्याच्या पंचक्रोशीतून शेतकरी आणि अन्य नागरिक आले होते. शिवसेना नेते अभय साळुंके यांनी पुढाकार घेत या आंदोलनाचं आयोजन केलं होत. यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यासाठी कालच निलंगा येथे आले होते. संभाजी पाटील विरोधी पक्षात असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नी त्यांनी वीज मंडळाच्या अधिकार्‍याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता शेतकर्‍यांचे प्रश्न गंभीर असताना, संभाजी पाटील सत्तेत असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? असा प्रश्न करीत साळुंके यांनी हा लिलाव ठेवला होता. कॉंग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह लिलावात सहभागी होण्यासाठी २३०० शेतकर्‍यांनी प्रत्येकी १०० रुपयांची अनामत भरली होती.
आजच्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काल पोलिस गाडीने पानचिंचोलीत तीन चकरा मारल्या. अभय साळुंकेंना लिलावाआधी उचलणार, बडवणार अशा अनेक अफवा चर्चिल्या जात होत्या.


Comments

Top