HOME   टॉप स्टोरी

भटकलेल्या परित्यक्तेला सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळवून दिले माहेर

नवर्‍याने सोडून दिले, माहेरी जाण्याची भिती, दोन वर्षे भटकत रहिली गावोगावी


लातूर: नाव शीतल शशिकांत देडे. वय २५. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. नवर्‍याशी पटलं नाही. नवर्‍याने दोन महिने नांदवले अन सोडून दिले. आता कुठं जायचं? माहेरचे स्विकारतील का? माहेरी काय सांगायचं?......मग सुरु झाली भटकंती. कधी या गावात, कधी त्या गावात. मिळेल ते काम करायचं. जमेल तिथे आसरा घ्यायचा. सकाळी पुन्हा नव्या कामाचा शोध घ्यायचा. कधी कधी उपाशी रात्र काढायची. शीतल अशीच एक दिवस भटकत किल्लारीत आली. डोक्यावरही परिणाम झाला होता. त्यातच उजव्या पायाला अल्सर झालेला. आरपार छिद्र पडलेलं. काम मागत, जेवायला मागत भटकताना सुमीत गावंडे यांनी पाहिलं आणि राष्ट्र सेवा प्रतिष्ठानचे सय्यद मुस्तफा यांना कळवले. मुस्तफा यांनी आपल्या सहकार्‍यांसह किल्लारी गाठले. तिथे उपचार केले. लातुरात आणून सरकारी दवाखान्यातही दवापाणी केले. थोडे बरे वाटल्यानंतर लातुरच्या महिला वसतीगृहात आसरा दिला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शीतलच्या माहेरचा शोध घेतला. तुळजापूर तालुक्यातील मड्डी सलगरा हे तिचे माहेर असल्याचे समजले. महिला वसतीगृहाची रितसर परवानगी घेऊन खास वाहनाने सलगरा गाठले. शीतलला आई वडिलांच्या स्वाधीन केले. शीतलला पाहून सर्वांनाच रडू कोसळले. लेक परत मिळाल्याचा आनंदही झाला. राष्ट्र सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समाधानाने लातुरला परतले.
या सत्कार्यात प्रतिष्ठानचे आकाश गायकवाड, आसिफ पठाण यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्वातीताई ढिमले व बापूसाहेब दगडे पाटील यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानने आजवर ४५ मनोरुग्णांचे पुनर्वसन केले आहे. तीन अत्याचारग्रस्त मुलींना न्याय मिळवून दिला. एका मतीमंदाची पुढच्या उपचाराची सोय केली आणि हरवलेल्या एका दोन वर्षाच्या मुलाचा शोध लावून आई वडिलांच्या स्वाधीन केले. लातुरात फेमस असणार्‍या बबलू नावाच्या मनोरुग्णाचेही या प्रतिष्ठानने पुनर्वसन केले आहे. बबलू सध्या येरवड्यात आहे.


Comments

Top