HOME   टॉप स्टोरी

अंबाजोगाई आणि कळंबकडून पाण्याचा मोठा उपसा

उस्मानाबाद आणि बीड जिल्हाधिकार्‍यांकडे करणार तक्रार, दहा दिवसांपुरता उपसा करा


अंबाजोगाई आणि कळंबकडून पाण्याचा मोठा उपसा

लातूर: मागच्या अनेक वर्षात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याने पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसल्या आहेत. हा मागचा अनुभव लक्षात घेऊन पाणी उपसा आणि वितरणाचे नियिजन व्हायला हवे पण तसे होताना दिसत नाही. धनेगाव-मांजरा धरणावरुन लातूर, कळंब, केज, धारुर, अंबाजोगाई, मुरुड या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होतो. तसेच लातूर एमआयडीसीलाही पाणी पुरवठा होतो. लातुरात दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. कळंबमध्ये मात्र आठ दिवसाला पाणी मिळते. सणासुदीच्या काळात हा पुरवठा नियमन तारखा बाजुला ठेऊन गरजेनुसार केला जातो. अंबाजोगाई आणि कळंबमधून पाण्याचा अनियमित आणि मोठा उपसा केला जातो अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. मांजरा धरणावर अवलंबून असलेल्या गावांनी नियमानुसार पाणी उपसल्यास धरणातील पाणी पुढच्या डिसेंबरपर्यंत पुरु शकते असं जबाबदार अधिकारी सांगतात. काही शहरांकडून केला जाणारा अनियमित आणि मनमानी उपसा थांबवावा अशा आशयाचे तक्रारवजा निवेदन उस्मानाबाद आणि बीड जिल्हाधिकार्‍यांना दिले जाणार असल्याची माहिती लातूर पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकार्‍यांनी दिली.
पाणी पुरवठा सुरळीत
लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यात सातत्याने तांत्रि अडचणी येत असतात. परवा नागझरीच्या पाईपलाईनमध्ये दोष निर्माण झाल्याने एक दिवस पाणी पुरवठा थांबला. २५ चा पाणी पुरवठा २६ वर आला, २६ चा पुरवठा २७ डिसेंबरला झाला. आता तरी हा पुरवठा सुरळीत झाला आहे. लातूर शहराला मीटरद्वारे पाणी पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत जनजागरण व्हावे यासाठी दोन दिवसांची कार्यशाळाही घेण्यात आली. शहरातील अनेक भागात समान दाबाने पाणी मिळत नाही. तांत्रिक दोषांमुळे अनेक भागात अतिशय अल्प पाणी मिळते तर अनेक भागात दहा-दहा तास पाणी सुरु असते. अशा अवस्थेत मीटरची व्यवस्था काय कामाची? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. १९५२ मध्ये लातुरात नगरपालिका स्थापित झाली पण पाणी वितरणाचा प्रश्न अद्याप काही सुटला नाही याबद्दल नागरिक खेद व्यक्त करीत आहेत.


Comments

Top